पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चाळीसपेक्षा जास्त जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात चीड आणि संताप आहे. यानंतर देशात काश्मिरी तरूणांवर हल्ले होत आहेत. हे हल्ले भाजपाप्रणित आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्या, बदला घ्या अशीच देशवासीयांची भावना आहे. अशात काश्मिरी तरूणांवर हल्ले होत आहेत. ही बाब दुर्दैवी असून पाकिस्तानला आपल्या देशात जी दुही माजवायची आहे तो त्यांचा उद्देश सफल होतो आहे असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला जाणारं पाणी रोखण्याचा इशारा दिला आहे. मात्र हा अधिकार त्यांना नाही असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गडकरींवर आणि मोदींवर टीका केली आहे. पुणे आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी पार पडल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ही टीका केली.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. सैन्याला सर्वाधिकार दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले. मात्र घटनेनुसार सैन्याला सर्वाधिकार देता येत नाहीत. सध्याची स्थिती लक्षात घेतली तर सरकार गोंधळात आहे असंच दिसत असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. काश्मिरी तरूणांवर होणारे हल्ले भाजपा प्रणित असून भारतात दुही माजवण्याचा पाकिस्तानचा हेतू साध्य होत असल्याचाही आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

याचवेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांबद्दलही आपलं मत व्यक्त केलं. प्रकाश आंबेडकरांना आम्ही ऑफर दिली आहे. पण त्यावर ते गंभीर आहेत असं वाटत नाही. मात्र आम्ही आमच्या बाजूने त्यांना ऑफर दिली आहे. आमची प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी आमच्याबरोबर यावे आणि मतांचं विभाजन टाळावं. पण त्यांचा जर वेगळा गेमप्लॅन असेल तर आम्हाला माहीत नाही. मताचा विभाजन व्हावे. अशी भाजपची इच्छा असेल आणि त्यांना जर कोणी मदत करत असेल तर त्याला कोणी काही करू शकत नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.