अन्न व औषध प्रशासनाच्या विरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून राज्यातील औषध दुकाने सोमवारपासून दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय ‘द महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’ने घेतला आहे.
औषध दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी औषध विक्रेत्यांच्या ‘द महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’ या संघटनेने खरेदी बंद आंदोलन सुरू केले आहे. १ जूनपासून हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सचिवांशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र, या बैठकीतून काहीही तोडगा निघाला नसल्यामुळे संघटनेने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून सोमवारपासून दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेतच औषध दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत.
याबाबत संघटनेचे पुणे जिल्ह्य़ाचे सचिव विजय चंगेडिया यांनी सांगितले, ‘‘औषध दुकान सुरू असताना पूर्ण वेळ दुकानामध्ये फार्मासिस्ट हवाच, या धोरणाचा अन्न व औषध प्रशासन अतिरेक करत आहे. प्रशासनाची अडवणुकीची भूमिका आहे. त्यामुळे संघटनेने आंदोलन अधिक तीव्र केले आहे.’’