News Flash

महागडय़ा मोटारींचे मोनोग्राम चोरीचा ‘उद्योग’

अल्पवयीन शाळकरी मुले झटपट पैसे कमाविण्यासाठी मोनोग्राम चोरीचा ‘उद्योग’ करत असल्याचेही उघडकीस आले आहे.

विदेशी बनावटीच्या आलिशान महागडय़ा मोटारी आणि या महागडया मोटारींवर असणारी बोधचिन्हं (मोनोग्राम) म्हणजे एकप्रकारचे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. या मोनोग्रामना बाजारात असलेले महत्त्व लक्षात घेऊन गेल्या काही दिवसांपासून शहरात महागडय़ा मोटारींचे मोनोग्राम चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अल्पवयीन शाळकरी मुले झटपट पैसे कमाविण्यासाठी मोनोग्राम चोरीचा ‘उद्योग’ करत असल्याचेही उघडकीस आले आहे.
विदेशी बनावटीच्या ऑडी, बीएमडब्ल्यू, जॅग्वार, स्कोडा अशा आलिशान मोटारींच्या किमती लाखो रुपयांच्या घरात आहेत. एकेकाळी मोटार विकत घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, व्यापारीवर्गाकडे महागडय़ा मोटारी पाहायला मिळायच्या. मात्र, गेल्या काही वर्षांत पुणे शहरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठय़ा प्रमाणात पैसा मिळू लागल्याने अनेकांनी महागडय़ा आलिशान मोटारी विकत घेतल्या. शहरालगतच्या गावांमधील अनेकांनी केवळ हौसेपोटी महागडय़ा मोटारी विकत घेतल्या आहेत. या मोटारींच्या मोनोग्रामाच्या किंमती साधारणपणे सात हजारांच्या पुढे आहेत.
शंकरशेठ रस्त्यावर महागडय़ा मोटारींचे मोनोग्राम चोरणाऱ्या दोन शाळकरी मुलांना पोलीस शिपाई अमोल पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार आम्ही पकडले. त्यांची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांची कौटुंबिक परिस्थिती चांगली असल्याची माहिती मिळाली. शाळकरी मुलांना पालक खर्चासाठी पैसे (पॉकेट मनी) देतात. हे पैसे संपल्यानंतर अशी मुले मौजमजेसाठी महागडय़ा मोटारींचे मोनोग्राम लांबवितात. विवाह समारंभ, मोठय़ा सोसायटय़ा आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारींवर लक्ष ठेवून मोनोग्राम लांबविले जातात, अशी माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
चोरलेले मोनोग्राम नाना पेठेतील गाडय़ांचे सुटे भाग खरेदी -विक्री करणाऱ्यांकडे विकण्यात आले आहेत. चोरलेले मोनोग्राम खरेदी करणाऱ्याचे नाव पोलिसांना समजले असून तो पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. ज्या मोटारचालकांचे मोनोग्राम चोरीला गेले आहेत त्यांनी खडक पोलीस ठाण्यात (दूरध्वनी- ०२०-२४४७६४२२ किंवा -२४४५२०९५) संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

अवघ्या एक ते दोन हजारात मोनोग्रामची विक्री
विदेशी बनावटीच्या मोटारींच्या मोनोग्रामच्या किमती साधारणपणे सात हजार रुपयांच्या पुढे आहेत. चोरलेल्या मोनोग्रामची खरेदी अवघ्या एक ते दोन हजार रुपयांत केली जाते. नाना पेठेतील काही विक्रेते चोरलेले मोनोग्राम शाळकरी मुले आणि भुरटय़ा चोरांकडून खरेदी करतात. अशा विक्रेत्यांवर पोलिसांची नजर आहे.
रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 3:19 am

Web Title: thievery of car monograms
Next Stories
1 अनधिकृत बांधकामांचा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच
2 ‘मानवंदना गोनीदांना’ कार्यक्रमातून साहित्यदर्शन आणि व्यक्तिदर्शन
3 चित्रांतून बनारसचे सौेंदर्य उलगडणार
Just Now!
X