एकीकडे दहा वर्षांमध्ये नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या प्राध्यापकांना नेट-सेट परीक्षेमधून सूट दिलेली असताना दुसरीकडे दरवर्षी नेट-सेट उत्तीर्ण करणारे हजारो उमेदवार अजूनही बेकार आहेत. मात्र पात्रता धारण करूनही बेकार असलेल्या या उमेदवारांसाठी शासनाकडे कोणतीही योजना नाही.
नेट-सेट उत्तीर्ण न होणाऱ्या प्राध्यापकांना एक एप्रिलपासून नियमित करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयानेही समाधानी न झालेल्या प्राध्यापकांनी नेट-सेट उत्तीर्ण न झालेल्या प्राध्यापकांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने सर्व लाभ मिळावेत या मागणीसाठी त्यांचा परीक्षांच्या बहिष्कार कायम ठेवला आहे. अपात्र असूनही नोकरी मिळालेल्या प्राध्यापकांचा हा आडमुठेपणा आहे, तर दुसरीकडे दरवर्षी हजारो उमेदवार नेट-सेट उत्तीर्ण होऊनही बेकार राहिले आहेत. प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याचाही घाट शासनाने घातल्यामुळे या प्रश्नात अजूनच भर पडली आहे.
एम.ए.च्या परीक्षेत मराठी विषयात सुवर्णपदक मिळवणाऱ्या दिनेशला (नाव बदलले आहे) नेट-सेटच नाही तर पीएच.डी.ची पात्रता धारण करूनही कोणत्याही महाविद्यालयामध्ये नोकरी मिळालेली नाही. दिनेशने विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये मराठी विषयामध्ये एमए केले. त्या वेळी त्याला सुवर्णपदकही मिळाले. प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहून त्याने एमए पूर्ण केल्यावर लगेचच २००३ साली सेट आणि नंतर लगेच नेट परीक्षाही उत्तीर्ण केली. २००९ साली अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्याने पीएच.डी.ही मिळवली. मात्र, अजूनही त्याला कोणत्याही महाविद्यालयामध्ये नोकरी मिळालेली नाही. नेट-सेट झाल्यानंतर दिनेशला लगेच नोकरी मिळाली असती, तर आज तो प्राचार्यपदासाठीही पात्र ठरू शकला असता. मात्र, सध्या विविध संस्थांच्या महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करण्याची वेळ दिनेशवर आली आहे. ‘तासिका तत्त्वावर काम करत असल्यामुळे संस्थेकडून अनुभवाचे पत्र दिले जात नाही आणि अनुभव नसल्यामुळे नोकरीच्या शक्यता अधिकच कमी होतात. आवड म्हणून या क्षेत्रात येऊन आवश्यक असलेल्या सर्व पात्रता मिळवूनही कामाची चांगली संधी मिळाली नाही,’ अशी खंत दिनेश व्यक्त करतो.
राज्यभरातील अनेक उमेदवारांची आज हीच कथा आहे. पात्रता धारण करूनही नोकरीची संधी न मिळणाऱ्या उमेदवारांचा रविवारी पुण्यात मेळावा झाला. याबाबत अखिल महाराष्ट्रीय सेट-नेट, बी.एड., डी.एड. पात्रताधारक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. पात्रताधारक असूनही बेकार असणाऱ्या उमेदवारांना बेकार भत्ता द्यावा, त्यांच्या नेमणुकांसाठी रिक्रुटमेंट बोर्डाची स्थापना करावी, महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची नियमित पदे भरण्यात यावीत, अशा मागण्या या संघटनेने केल्या आहेत. त्यासाठी मे महिन्यामध्ये मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.