बालभारतीच्या इयत्ता अकरावीच्या ‘वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन’ विषयाच्या पुस्तकात हजारो चुका असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या पुस्तकात दुरुस्ती केल्याचे बालभारतीचे म्हणणे असून, प्रत्यक्षात पुस्तकात अद्यापही चुका असल्याचे दिसून येते.

वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन विषयाच्या अभ्यास मंडळाचे माजी सदस्य प्रा. भानुदास चौधरी यांनी या चुका दाखवून दिल्या. ‘वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन’ हे मराठी माध्यमाचे पुस्तक २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात चुका आहेत. त्यात व्याकरणाच्या आणि आशयाच्या दोन्ही प्रकारच्या चुकांचा समावेश आहे.

‘‘पुस्तकातील चुका गेल्या वर्षीच मंडळाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यातील काही चुका यंदा दुरुस्त करण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही पुस्तक संपूर्णत: निर्दोष झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या विषयासाठीचे अभ्यास मंडळ अपात्र आहे. ते बरखास्त करण्यात यावे. तसेच सदर पुस्तक रद्द करून त्याचा खर्च अभ्यास मंडळाच्या सदस्यांकडून वसूल करण्यात यावा. विनोद तावडे आणि प्राची साठे यांच्या कार्यकाळात या अभ्यास मंडळाची नेमणूक करण्यात आली आहे,’’ असे प्रा. चौधरी यांनी सांगितले.

फास्ट फूड म्हणजे सकस आहार..

या चुकांमध्ये चक्क सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव चुकले आहे. जागतिक बँके ची माहिती देताना ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’चे भाषांतर ‘राज्यपाल मंडळ’ असे करण्यात आले आहे, तर ‘फास्ट फूड’च्या जागी ‘सकस आहार’ असे लिहिण्यात आले आहे, अशी माहिती प्रा. भानुदास चौधरी यांनी दिली.

चौधरी यांनी गेल्या वर्षी मंडळाच्या निदर्शनास आणलेल्या आशयाच्या चुकांची दुरुस्ती करून त्याचे शुद्धिपत्र सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे, तसेच संके तस्थळावरही त्याची प्रत उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष २०२० साठीच्या पुस्तकात चुकांची दुरुस्ती करून पुनर्मुद्रण करण्यात आले आहे. तरीही पुस्तकात काही चुका राहिल्या असल्यास त्या मंडळाला कळवाव्यात. त्या अभ्यास मंडळापुढे ठेवून अभिप्रायानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

– विवेक गोसावी, संचालक, बालभारती