खेड पोलीस ठाण्यातून दोन आरोपींनी खिडकीचे लोखंडी गज कापून पलायन केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. कारागृहाच्या बाहेरून आरोपींना त्यांच्या साथीदारांनी मदत केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार कैलास प्रभू कड यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास खेड पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

आरोपी विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२ रा मंचर ता.आंबेगाव जि.पुणे) आणि आरोपी राहुल देवराम गोयेकर (वय २६ रा.गोयेकरवाडी ता.कर्जत जि. अहमदनगर) यांनी तीन महिन्यांपूर्वी ट्रक चालकाला लुटले होते. याच प्रकरणात त्यांना दि.१६ ऑक्टोबर रोजी रात्री पाऊणेदहाच्या सुमारास खेड पोलिसांनी अटक केली. दुसऱ्या दिवशी आरोपीना याप्रकरणी न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही आरोपींना २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र या काळात त्यांनी आणखी जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

सोमवारी पहाटे त्यांनी खेड पोलीस ठाण्याच्या कारागृहातील खिडकीचे लोखंडी गज तोडून पलायन केले. विशेष म्हणजे यात त्यांना त्यांच्या साथीदारांनी कारागृहा बाहेरून मदत केल्याचे बोलले जात आहे. तसेच ठाण्यात तीन पोलीस कर्मचारी असतात. त्यांना गज कापताना आवाज आला नाही का, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.