आठवडाभर मुंबई, ठाणे परिसरासह कोकण विभागात सर्वत्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पडलेल्या मुसळधार सरींमुळे राज्यातील एकूण पाऊस सरासरीच्या पुढेच राहिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १२ जुलैपर्यंत कोकण विभागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी असणार आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणीच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, कोकणसह राज्यात काही ठिकाणी बुधवारी (८ जुलै) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

राज्याच्या किनारपट्टीच्या भागांत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आठवडाभर कोकण विभागात विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी आहे. मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकणातील काही जिल्ह्यंमध्ये अतिवृष्टीही झाली. या कालावधीत कोकणच्या जवळ असलेल्या मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही मुसळधार पाऊस झाला. विदर्भात हलका पाऊस होता, तर मराठवाडय़ात बहुतांश वेळेला पावसाने दडी मारली होती. या कालावधीत कोकण विभागातील पावसाने राज्यातील पावसाची सरासरी भरून काढून ती ओलांडली. राज्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवडय़ाच्या शेवटी पावसाची सरासरी ३०० मिलिमीटरच्या आसपास असते. पण, प्रत्यक्षात पावसाची नोंद ३५० मिलिमीटरपेक्षाही अधिक झाली आहे.

विदर्भातील अकोला, यवतमाळ आणि गोंदिया हे जिल्हे सोडल्यास इतर जवळपास सर्वच जिल्ह्यंमध्ये पाऊस सरासरीच्या आसपास किंवा त्यापुढे आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर कोकण विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. ९ जुलैला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.