पुणे शहरात पक्षाचा जनाधार वाढवण्यावर भर देणार असून जे भाग आतापर्यंत पक्षासाठी कठीण ठरले आहेत तेथे अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. संघटनात्मक काम आणि शहराच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न अशा पद्धतीने काम करणार असल्याचेही ते म्हणाले.
शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिरोळे यांनी पक्षबांधणी, पक्षाचे संघटनात्मक कार्यक्रम आणि शहराच्या विकासाचे पक्षाकडून घेतले जाणारे कार्यक्रम यासंबंधीची माहिती मंगळवारी दिली. पक्षाचे प्रदेश चिटणीस योगेश गोगावले, प्रा. मेधा कुलकर्णी, महापालिकेतील गटनेता अशोक येनपुरे, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, मुरलीधर मोहोळ, संदीप खर्डेकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याबरोबरच शहराच्या विकासासाठी अनेक योजना व कार्यक्रम राबवणार असल्याचे शिरोळे यांनी या वेळी सांगितले.
पुणे शहराचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी संकल्प केला असून तसा कार्यक्रमही तयार असल्याचे सांगून शिरोळे म्हणाले की, पाण्याच्या कमतरतेवर उपाययोजना, सक्षम सार्वजनिक वाहतूक, प्रभावी मैलाशुद्धीकरण, नदीसुधारणा, पाणीपट्टी तसेच अन्य थकबाकी वसुली आदी अनेक योजना करून शहराचा विकास करणे शक्य आहे. अद्ययावत आणि कमी खर्चातील मेट्रो, पीएमपी सक्षम करणे, गाडय़ांची संख्या वाढवणे आदी उपाययोजना करणेही आवश्यक आहे. शहरातील बांधकाम उद्योगाबाबतही व्यापक विचार करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
शहरवासीयांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कोपरे, कट्टे, उद्याने, वॉर्ड, प्रभाग, शहर या स्तरावर तक्रारी स्वीकारण्याची, तसेच त्यांची तातडीने दखल घेऊन त्या सोडवण्यासाठीची कार्यवाही आवश्यक आहे. त्या दृष्टीने पक्षातर्फे प्रयत्न केले जातील, असेही शिरोळे यांनी सांगितले.
लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे मी म्हटले असले, तरी पक्ष ठरवेल तोच उमेदवार असेल आणि पक्षाने सांगितलेल्याच उमेदवाराचे काम आम्ही सर्व जण मिळून करू, असेही शिरोळे यांनी सांगितले.