वृक्षारोपण अनेक जण करतात, पण ते केल्यानंतर लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली आणि किती वाढली याचा विचार केला जात नाही. पुणेकरांचा एक गट मात्र वेताळ टेकडीवर देशी वृक्ष लावण्यासाठी आणि ते जगवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या गटाने टेकडीवर वर्षभरापूर्वी ८१२ झाडे लावली होती. हे देशी वृक्ष आजही जोमात वाढत असून या पावसाळ्यात आणखी १,३३० वृक्ष वेताळ टेकडीवर लावले जात आहेत.
पाषाणमधील पंचवटी येथे राहणारे के. डी. गारगोटे आणि विद्या गारगोटे या वृक्षप्रेमी दांपत्याने मित्रमंडळींबरोबर हा उपक्रम सुरू केला असून झाडे लावण्याचा आणि वाढवण्याचा सर्व खर्च गारगोटे दांपत्य करत आहे. के. डी. गारगोटे आणि वृक्षप्रेमी राजेंद्र आवटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गारगोटे आणि मित्रांनी आंबा, जांभूळ, पिंपळ, वड, करंज, आपटा, कडुनिंब, उंबर असे देशी वृक्ष टेकडीवर लावले आहेत. झाडांना नियमित पाणी देता यावे यासाठी गारगोटे यांनी पाण्याच्या २००० लिटरच्या ५ टाक्या बसवून घेतल्या आहेत. पाण्याच्या नळीद्वारे वृक्षांसाठी ठिबक सिंचनाचीही सोय केली आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक वृक्षाला क्रमांक देऊन त्याची देखभाल करण्यासाठी दोन सहायकही नेमले आहेत. एका वर्षांनंतर ही सर्व ८१२ झाडे साधारणपणे एक मीटर उंच झाली आहेत. टेकडीवर पक्ष्यांची संख्या वाढावी यासाठीही प्रयत्न केले जात असून पक्ष्यांसाठी पाणी पिण्याची ३ लहान तळी तयार करण्यात आली आहेत. उन्हाळ्यात पक्ष्यांना धान्यही टाकले जात होते. या सर्व गोष्टींना ४ लाख ४६ हजार रुपयांचा खर्च आला असून तो गारगोटे यांनी स्वत: केला आहे.
गारगोटे म्हणाले, ‘‘झाडे लावण्यासाठी आम्ही वन विभाग आणि पुणे महापालिकेचे मार्गदर्शन घेतले. सुरुवातीला आम्ही खासगी रोपवाटिकेतून झाडे आणत होतो, परंतु या पावसाळ्यात आम्ही लावत असलेली १,३३० झाडे पालिकेने पुरवली आहेत. पाण्याची अनुपलब्धता असताना पालिकेने तसेच स्थानिक कार्यकर्ते सुहास निम्हण यांनी पाणी पुरवले.’’