चालकाचे नियंत्रण सुटलेली मोटार एका टेम्पोला मागून धडकल्याने मोटारीतील दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत. पुणे-मुंबई महामार्गावर ताजे गावच्या हद्दीमध्ये शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
सत्यप्रकाश पारसनाथ यादव (वय २९, रा. आरे डेअरीजवळ, गोरेगाव (ई), मुंबई), मंदार सिद्धेश्वर देव (वय ५०, रा. लिना हाऊस, माहीम, मुंबई) यांचा या अपघातात मृत्यू झाला. मालविका देव (वय ४७), मिहिका देव (वय १७, रा. लिना हाऊस, माहीम) या दोघी जखमी झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देव कुटुंबीय शनिवारी सकाळी मोटारीतून पुणे-मुंबई महामार्गाने महाबळेश्वर येथे निघाले होते. सत्यप्रकाश यादव हे मोटार चालवित होते, तर मंदार देव चालकाच्या शेजारील आसनावर बसले होते. ताजे गावच्या हद्दीमध्ये त्यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव मोटार पुढे जात असलेल्या एका टेम्पोवर मागच्या दिशेने आदळली. त्यामुळे चालकासह पुढे बसलेल्या देव यांचा मृत्यू झाला. मागे बसलेल्या दोघी जखमी झाल्या.
एसटीच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
 पुणे-मुंबई महामार्गावर वलवण येथील घटना
पुणे-मुंबई महामार्गावर वलवण येथे एसटीच्या बसची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील एकजण ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला.
प्रदीप भटाडे (वय २३, रा. घाटकोपर, मुंबई) हा तरुण या अपघातात ठार झाला. दीपक लक्ष्मण रायकर (वय २९, रा. घाटकोपर, मुंबई) हा जखमी झाला आहे. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसटीची बस मुंबईहून विजापूरकडे निघाली होती. वलवण येथे ‘एमएच १४’ या हॉटेलच्या थांब्यावरून ही बस पुणे-मुंबई महामार्गावर आली. द्रुतगती मार्गासाठी असलेल्या उड्डाणपुलाच्या खांबाला बसने भरधाव वळसा घातला. त्यावेळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या दुचाकीला बसची धडक बसली. त्यामुळे दुचाकीवरील दोघे कोसळले व दुचाकी बसच्या मागील चाकाखाली गेली. यामध्ये प्रदीप याचा जागीच मृत्यू झाला, तर दीपक गंभीररीत्या जखमी झाला.
अपघातानंतर बसचा चालक व वाहक दोघेही पळून गेले. पोलिसांनी ही बस ताब्यात घेतली आहे. पुणे-मुंबई महामार्गावर वलवण येथे बसचे दोन खासगी थांबे आहेत. या थांब्यावरून मोठय़ा प्रमाणावर बस आत व बाहेर येत असतात. मात्र, या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने या भागात सातत्याने अपघात होत आहेत.