उच्चशिक्षित तरुणांना चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून फरार झालेल्या दोघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी १० ते १५ तरुणांची फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले आहे.
अजित बाळासाहेब शेळके (वय ३०, रा. चांदक, ता. वाई. जि. सातारा), महादेव साहेबराव यादव (वय ३२, रा. गुळंब, ता. वाई, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अजित माणिकराव जाधव (रा. रुपीनगर, भालेकर चाळ, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेळके व यादव हे दोघे अमित कुलकर्णी व सचिन जाधव, अशी खोटी नावे सांगून बाणेर रस्त्यावरील इंजिग्मा कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवित होते.
फिर्यादी अजित जाधव यांनाही आरोपीने मोठय़ा पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्यांच्याकडून एक लाख रुपये उकळले. त्यानंतर आरोपींनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. हे नियुक्तीपत्र जाधव यांनी त्यांच्या मित्रांना दाखविले. त्यामुळे इतर १० ते १५ जणांनीही नोकरी लागण्याच्या आशेने आरोपींना पैसे दिले. जाधव हे नियुक्तीपत्र घेऊन संबंधित कंपनीत गेल्यानंतर ते बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शेळके व यादव यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन बंद केला होता. सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या या प्रकारानंतर आरोपी फरार होते. फरासखाना पोलीस तपास पथकाचे कर्मचारी शंकर कुंभार यांना खब-यामार्फत या आरोपींबाबत माहिती मिळाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आले.