हिंजवडी परिसरात दोनअल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या प्रकरणी गणेश निकम (वय २२) या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.  या कृत्यात गणेशला साथ देणाऱ्या १६ वर्षांच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कासारसाई येथील दोन मुली रविवारी विभागातील मंदिर परिसरात खेळायला गेल्या. गणेश आणि त्याच्या साथीदाराने या दोघींना तिथे जाताना पाहिले होते. त्यांच्या पाठोपाठ दोघेही तिथे पोहोचले. यानंतर दोघांनी त्या मुलींना चॉकलेटचे आमीष दाखवत मंदिरामागील जंगलात नेले. तिथे गणेश व त्याच्या साथीदाराने दोघींवर बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास ठार मारु, अशी धमकीही त्या नराधमांनी मुलींना दिला होती.

दोन्ही मुलींनी घरी आल्यावर भीतीपोटी कुटुंबियांना काहीच सांगितले नाही. मंगळवारी यातील १२ वर्षांच्या मुलीची प्रकृती खालावली आणि कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तपासणी दरम्यान तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. या प्रकरणाची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.

मात्र, मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्याने पोलिसांना तिचा जबाब घेता आला नाही. शेवटी दुसऱ्या मुलीने धाडस दाखवले आणि आई – वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी देखील या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

बुधवारी रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर या घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या दुसऱ्या पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नराधम गणेशला अटक केली. त्याच्या १६ वर्षांच्या मित्रालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहे. दोन्ही मुलींचे पालक हे ऊस तोड कामगार आहेत. तर दोन्ही आरोपी हे एका फॅक्टरीमध्ये कामाला होते. हत्या, बलात्कार अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.