वारजे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्याने दोन जणांचे खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. खून झालेला एक तरुण या आरोपीचा मित्र होता. हा आरोपी व त्याच्या साथीदारांनी १४ जबरी चोरीचेही गुन्हे केले असून, या गुन्हय़ात त्यांच्याकडून सहा लाख १६ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ललित दीपक खोल्लम (वय २८, रा. गहुंजे, ता. मावळ) असे मुख्य आरोपीचे नाव असून, त्याच्यासह पोलिसांनी मयूर दिलीप राऊत (वय २०, रा. गहुंजे, मावळ), आदेश कैलास नेटके (वय २१, रा. विकासनगर, देहूरोड), युवराज नंदकुमार मगर (वय २८, रा. देहूरोड), आकाश सुनील कुंभार (वय २१, रा. आंबेडकर रस्ता, देहूरोड) यांना जबरी चोरीच्या गुन्हय़ात अटक केली आहे.
वारजे पोलिसांनी जबरी चोरीच्या तपासात आरोपींकडे केलेल्या चौकशीमध्ये खोल्लम याने साथीदाराच्या मदतीने दोन खून केल्याचे उघड झाले. बाळू तुकाराम काकरे (रा. तळेगाव दाभाडे) याचा ९ मे २०१२ मध्ये त्याने खून केला होता. आपल्या पत्नीकडे वाकडय़ा नजरेने पाहतो या कारणावरून खोल्लमने सुरुवातीला काकरे याचे अपहरण केले. त्यानंतर कारासा घाटात नेऊन त्याचा गळा चिरून खून करण्यात केला व मृतदेह दरीत टाकून दिला. खोल्लम याने त्याचा मित्र पवन किसन मेढे याचाही खून केला. मेढे याच्या प्रेयसीशी खोल्लमला विवाह करायचा होता. मेढे याला ठार केल्यास हा विवाह होईल या कारणावरून मेढेला त्याने साताऱ्यात मित्राकडे जाण्याचा बहाणा करून बरोबर घेतले. साताऱ्यातील कोरेगाव येथे त्याला दारू पाजली व डोक्यात लोखंडी पाइप मारून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. दोन्ही खुनाचे व मृतदेह टाकल्याचे ठिकाण खोल्लमने पोलिसांना दाखवले. त्यानंतर त्याच्यावर खुनाचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.