25 November 2017

News Flash

राज्यात ऑगस्टअखेर दोन हजार स्वयंचलित हवामान केंद्रे

हवामानाच्या अंदाजाबरोबरच या हवामान केंद्रांमुळे जमिनीतील ओलाव्याचीही माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.

प्रतिनिधी, पुणे | Updated: July 16, 2017 4:22 AM

राज्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेऊन पेरणी करण्यासंबंधी अचूक माहिती व्हावी, यासाठी राज्यात स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. येत्या ऑगस्टअखेर अशी दोन हजार पासष्ट केंद्र उभारण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. हवामानाच्या अंदाजाबरोबरच या हवामान केंद्रांमुळे जमिनीतील ओलाव्याचीही माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.

यंदा हवामानाचा अंदाज चुकल्याने आणि योग्य वेळी पेरणी न करण्याची आगाऊ सूचना न दिल्याने राज्य शासना बरोबरच हवामान विभागावर चहुबाजूने टीका होत आहे. मोसमी वाऱ्यांबरोबरच स्थानिक घटकही हवामानावर मोठा प्रभाव टाकतात. तसेच सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे पावसाचा लहरीपणा वाढला आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यात स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली असून त्यासंबंधीची कामेही सुरू झाली आहेत. ‘हवामानावर आधारित नऊशे स्वयंचलित केंद्रांचे काम सुरू झाले असून पाचशे केंद्रांच्या उभारणीचे काम सुरू आहे. ऑगस्टअखेर ही सर्व केंद्र सुरू होतील. ही केंद्र सुरू झाल्यानंतर स्थानिक वातावरणातील आद्र्रता, वाऱ्याची दिशा आणि हवामानावर प्रभाव टाकणारे इतर घटकही समजणार असून त्याची अचूक माहिती संकलित करण्यात येईल. त्यामुळे आगामी काळात हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे’, अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी शनिवारी दिली.

मुंबईत १९ जुलै रोजी बैठक

हवामान केंद्राच्या कामात जपानी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली असून त्यामुळे जमिनीतील ओलावादेखील समजणार आहे. त्यामुळे एखाद्यावेळी पावसाने ओढ दिल्यास पीक किती काळ तग धरू शकेल, याचा अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. याबाबत १९ जुलै रोजी मुंबईत बैठक बोलाविण्यात आली असून अहमदाबाद येथील कृत्रिम उपग्रहावर आधारित माहिती देणारे अंतराळ शास्त्रज्ञ, पुणे व मुंबई वेधशाळेतील तज्ज्ञ, स्कायमेट या हवामान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाचे अधिकारी बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

– विजयकुमार, प्रधान सचिव, राज्य कृषी विभाग

First Published on July 16, 2017 4:22 am

Web Title: two thousand automatic weather station at the end of august in maharashtra