जिल्ह्य़ाच्या हद्दीमध्ये नऱ्हे येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाल्यामुळे हद्दीलगतच्या अनधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील सर्व गावांमधील सरपंचांनी एक महिन्यांत सध्या सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या बांधकामांचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी सजग नागरिक मंचाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
पालिका हद्दीलगतच्या गावांमध्ये बांधकाम करण्यासाठी राज्य सरकारच्या नगरनियोजन विभागाची आणि जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, परवानगी न घेता मोठय़ा प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. या अवैध बांधकामांमध्ये जागा विकत घेणाऱ्या हजारो नागरिकांची आयुष्याची पुंजी अडकली आहे. पण, त्याचबरोबरीने त्यांची सुरक्षितता देखील धोक्यात आली आहे. त्यामुळे सर्व गावांतील सरपंचांनी एक महिन्यात त्या गावात सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या बांधकामांची यादी सादर करावी. त्यानंतर नगरनियोजन विभागाकडून त्यातील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्यात यावी. त्या बांधकाम कंत्राटदारासह सर्व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे आणि डॉ. विनायक आगाशे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे.