विद्यापीठ मसुद्याची कार्यवाहीच नाही

फग्र्युसन महाविद्यालयाचे विद्यापीठात रूपांतर करण्याची प्रक्रिया रखडली असल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयाचे विद्यापीठात रूपांतर करण्यात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्याने विद्यापीठाचा मसुदा तयार करण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीकडून काहीच कार्यवाही झालेली नाही.

राज्य शासनाने फग्र्युसन महाविद्यालयाचे फग्र्युसन विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी जानेवारी २०१९ मध्ये मान्यता दिली. त्यानंतर विद्यापीठाचा मसुदा तयार क रण्यासाठी फेब्रुवारीमध्ये समिती नियुक्त करण्यात आली. माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, उच्च शिक्षण संचालक  डॉ. धनराज माने, फग्र्युसनचे प्राचार्य डॉ. रवींद्र परदेशी, सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे (रुसा) मुख्य सल्लागार डॉ. विजय जोशी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अ?ॅड. नील हेळेकर, शिक्षणतज्ज्ञ आनंद मापुस्कर प्रा. डॉ. समीर तेरदाळकर आदी १० सदस्यांचा समावेश होता. फग्र्युसनचे विद्यापीठात रूपांतर करण्यासंदर्भातील मसुद्याच्या शिफारसी या समितीकडून शासनाला सादर करण्यात येणार होत्या. प्रत्यक्षात, या संदर्भातील कामच होऊ शकलेले नाही.

‘फग्र्युसन महाविद्यालयाचे विद्यापीठात रूपांतर करण्यातील काही तांत्रिक अडचणी शासनाकडे मांडण्यात आल्या होत्या. त्यात जमीन हस्तांतरण, संस्थेचे नियंत्रण या संदर्भातील काही प्रमुख मुद्दे होते. या अडचणी सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे या विषयावर जवळपास पाच ते सहा वेळा चर्चा झाली. मात्र, त्या संदर्भात पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालयाचे विद्यापीठात रूपांतर करण्याची प्रक्रिया मार्गी लागलेली नाही,’ अशी माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली.

विद्यापीठासाठीच्या जमिनीच्या अनुषंगाने काही तांत्रिक अडचणी संस्थेकडून मांडण्यात आल्या होत्या. त्या अडचणी शासनाकडून अद्याप दूर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मसुदा समितीकडून पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. – डॉ. आर. एस. माळी, मसुदा समिती अध्यक्ष