पुण्यातील हडपसर परिसरात अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास ३५ ते ४० दुचाकी गाड्यांची सीट कव्हर्स फाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील निर्मलनगर टाउनशिपमध्ये हा प्रकार घडला असून घटनास्थळी पोलीसांना पाचारण करण्यात आले आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. स्थानिक मुलांनीच हे कृत्य केले असावे असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी राहणा-या नागरिकांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील अनेक भागांमध्ये दुचाकी जाळण्याचे सत्र सुरू होते. आता यामध्ये सीट कव्हर्स फाडण्याच्या नव्या प्रकाराची भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पोलीस गुन्हेगारांचा छडा कधी लावणार असा सवाल वारंवार नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.