डॉ. अरुणा ढेरे, फादर दिब्रिटो यांच्यानंतर डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

पुणे : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान सन्मानाने देण्याची सुरुवात झाल्यापासून सलग तिसऱ्या वर्षी पुण्यातून सुचविल्या गेलेल्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. डॉ. अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यानंतर आता डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाला संमती मिळाल्याने अशीही हॅटट्रिक साधली गेली आहे.

नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची रविवारी बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेने डॉ. नारळीकर यांचे नाव सुचविले. या बैठकीमध्ये साहित्य महामंडळाकडे आलेल्या अन्य नावांसंदर्भात चर्चा झाली असली तरी नारळीकर यांचे नाव सुचविण्यात आल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे साहित्य महामंडळाच्या घटना दुरुस्तीद्वारे अध्यक्षपदाचा बहुमान देण्याची प्रथा सुरू झाल्यापासून डॉ. अरुणा ढेरे आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यानंतर आता डॉ. नारळीकर यांच्या रूपाने पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

साहित्य संमेलनाध्यक्षपद हा सन्मान आहे. ते आजवर केलेल्या कामासाठी दिले जाते. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि शिवाजी सावंत या ज्येष्ठ साहित्यिकांना गमावले ही खंत करायला लागू नये अशी महाराष्ट्र साहित्य परिषदेची भूमिका आहे. त्याच भूमिकेतून डॉ. नारळीकर यांचे नाव सुचविण्यात आले आहे, असे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी यांनी सांगितले.