‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ हे बालगीत असो, ‘गजानना श्री गणराया’ आणि ‘गणराज रंगी नाचतो’सारखी भक्तिगीते असोत, ‘जय शारदे वागेश्वरी’ ही प्रार्थना असो, ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ आणि ‘तोच चंद्रमा नभात’ ही विरहगीते असोत, ‘माझ्या सारंगा’ हे कोळीगीत असो, ‘रेशमाच्या रेघांनी’ आणि ‘नाव सांग सांग नाव सांग’ या लावण्या असोत, ‘जे वेड मजला लागले’ हे प्रेमगीत असो ‘ऋतू हिरवा’ आणि ‘ही वाट दूर जाते’ यांसारखी निसर्गवर्णनपर गीते अशा चौफेर काव्यलेखनाने रसिकांना आनंद देत ‘असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे’ असे म्हणणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचे अप्रकाशित लेखन ‘उन्हे आणि सावली’ या पुस्तकाद्वारे लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे.
शांता शेळके यांच्या निधनाला शुक्रवारी (६ जून) तपपूर्ती होत आहे. वाङ्मयाच्या प्रांतातील या श्रेष्ठ सारस्वतकाराच्या निधनाच्या १२ वर्षांनंतरही त्यांच्या कवितांची पुस्तके आणि कथा-ललित लेखसंग्रहाच्या पुस्तकांची मागणी वाढतच आहे. एका वृत्तपत्रासाठी केलेल्या ‘उन्हे आणि सावली’ या सदरातील महत्त्वपूर्ण लेखांसह आळंदी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील शांताबाईंचे अध्यक्षीय भाषण अशी मेजवानी वाचकांना या पुस्तकातून मिळणार असल्याची माहिती सुरेश एजन्सीचे शैलेंद्र कारले यांनी दिली. प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आणि केशव गोपाळ शिरसेकर यांनी या पुस्तकाच्या संपादनासाठी सहकार्य केले आहे.
भाषांतर-रूपांतर-भावानुवाद, अहंकार रसिकांचा, चरणस्पर्श, अर्पणपत्रिकांचे अजब विश्व, प्रसिद्ध लेखकांचे अप्रकाशित साहित्य, ‘प्राइड अॅन्ड प्रेज्युडिस’चा तो काळ, ओम नम: शिवाय, िबिदया ले गई हमार, तीन जोशी, कथा-दंतकथा-आख्यायिका, काही पसायदाने, पुलं : अद्भुत अलौकिक, शब्द : समज-गैरसमज’ असे विविध विषयांवरील शांताबाईंचे १३ लेख या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त ‘वाङ्मयीन जाणिवांचा बहर’ हा संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरचा त्यांनी लिहिलेला लेख आणि काही अप्रकाशित लेखनही वाचकांना देण्याचा प्रयत्न आहे. आमच्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘धूळपाटी’ या शांताबाईंच्या आत्मचरित्राची चौथी आवृत्ती, ‘वडीलधारी माणसं’ या पुस्तकाची सहावी आवृत्ती, शांताबाईंच्या चित्रपटगीतांचा समावेश असलेल्या ‘तोच चंद्रमा’ या संग्रहाची सातवी आवृत्ती सुरू आहे, तर चार वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या ‘आतला आनंद’ या ललित लेखसंग्रहाची तिसरी आवृत्ती निघाली असून, लेखक-कलावंतांची व्यक्तिचित्रे असलेल्या ‘नक्षत्रचित्रे’ पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे, असेही शैलेंद्र कारले यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jun 2014 रोजी प्रकाशित
शांता शेळके यांचे अप्रकाशित लेखन ‘उन्हे आणि सावली’तून वाचकांच्या भेटीला
ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचे अप्रकाशित लेखन ‘उन्हे आणि सावली’ या पुस्तकाद्वारे लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे.
First published on: 06-06-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unpublish notation shanta shelke poems