‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ची विभागीय अंतिम फेरी

पुणे : ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या वक्तृत्व स्पर्धेची पुणे विभागीय अंतिम फेरी बुधवारी स. प. महाविद्यालयात रंगणार आहे. भाषिक सहजता, मुद्देसूद मांडणी, आत्मविश्वास असे वक्तृत्वाचे सर्व पैलू आता जोखले जातील. म्हणूनच वक्त्यांच्या वक्तृत्वाचा खरा कस बुधवारी (१३ मार्च) लागणार आहे. विभागीय अंतिम फेरीतील दहा स्पर्धकांतून राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी कोण धडक मारणार, याची उत्सुकता आहे.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात होणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धामध्ये ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कारण या स्पर्धेतील विषय अत्यंत आव्हानात्मक असतात. प्रत्येक विषयाला अनेक कंगोरे असतात. प्रत्येक विषयाचा आवाका ‘लोकल ते ग्लोबल’ असा व्यापक असतो. त्यामुळे प्रत्येक विषयाचा आवाका समजून घेऊन त्यानुसार विषयाची मुद्देसूद आणि सर्वसमावेशक मांडणी करणे महत्त्वाचे ठरते.

अंतिम फेरीची तयारी करण्यासाठी स्पर्धक विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारी केली आहे. ग्रंथालयातून पुस्तके आणणे, बातम्या शोधणे, माहिती संकलित करणे, विषयाचा अभ्यास करणे, विषय अधिक प्रभावी होण्यासाठी त्यातील मुद्दय़ांची निवड करणे ही सर्व तयारी करून आता विद्यार्थी अंतिम फेरीसाठी सज्ज आहेत. विभागीय अंतिम फेरीतील १० स्पर्धकांतून सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या एका स्पर्धकाची महाअंतिम फेरीसाठी निवड केली जाईल.

विभागीय अंतिम फेरीतील स्पर्धक

स्नेहल पिपाडा (पेमराज सारडा महाविद्यालय)

निखिल बेलोटे (आबासाहेब गरवारे महाविद्यालय)

अश्विनी तावरे (आबासाहेब गरवारे महाविद्यालय)

शरयू बनकर (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय)

यशवंत खाडे (स. प. महाविद्यालय)

केतकी कुलकर्णी (विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी)

तृप्ती पाटील (सिंहगड दंतवैद्यक महाविद्यालय)

रितेश वाघ (सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय)

वैष्णवी कारंजकर (संज्ञापन वृत्तविद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

जयंतकुमार काटकर (इंदिरा मुक्त विद्यापीठ)

प्रायोजक

‘पीतांबरी कंठवटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’चे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर आणि पुनीत बालन एन्टरटेन्मेंट प्रा. लिमिटेड, या स्पर्धेचे पॉवर्ड बाय पार्टनर वास्तू रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.

कधी?

बुधवार, १३ मार्च दुपारी २.३० पासून

कुठे?

स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता

प्रवेश खुला आणि विनामूल्य.