नगर-पुणे राज्यमार्गावर नारायणगव्हाण शिवारात कुकडी कालव्यामध्ये मोटार पडून पुण्यातील वाघोलीच्या कुटुंबातील चौघांचा पाण्यात बूडून मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही मोटार कालव्यात पडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास मोटार पाण्याबाहेर काढण्यात आली. त्यानंतर मोटारीचे दरवाजे तोडून चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पुणे जिल्ह्य़ातील वाघोली येथील जाधव कुटुंबीयांची तालुक्यातील वाडेगव्हाण फाटा येथे मूकबधिर विद्यार्थ्यांची शिक्षण संस्था आहे. या संस्थेचे कामकाज पाहणारे मोतीलाल शिवलाल जाधव (वय ३६), त्यांची पत्नी दीपाली (वय ३०), मुलगा आदित्य (११) व दुसरा मुलगा यशराज (७) या पूर्ण कुटुंबाचा मृतांमध्ये समावेश आहे. ते शिर्डी येथे दर्शन घेऊन त्यांच्या मोटारीने वाघोलीला परतत होते.
जाधव कुटुंबीयांचा प्रवासात काहींशी फोन झाला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने शोधाशोध सुरू होती. त्याचा तपास मात्र सोमवारी सायंकाळी सातला लागला. जाधव यांच्या नातेवाईकांनी म्हसणे फाटा ते वाडेगव्हाण फाटा दरम्यानच्या रस्त्याची कसून पाहणी सुरू केली. नातेवाईक व त्यांच्या संस्थेतील शिक्षक हे पाहणी करीत असताना जाधव यांच्या मोटारीचा एक तुकडा त्यांना नारायणगव्हाण येथून वाहणाऱ्या कुकडी कालव्याजवळ आढळला. त्यावरून शोध घेतला असता वाहत्या कालव्यातून एका ठिकाणी ऑईल पाण्याबाहेर येत असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक वाखारे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोध घेतला असता कालव्यात मोटार असल्याचे लक्षात आले. क्रेनच्या साहाय्याने ती वर काढल्यानंतर त्यात चार मृतदेहही आढळून आले.
पाण्याबाहेर मोटार काढण्यात आल्यानंतर मोटारीत मोतीलाल, पत्नी दीपाली, मुले आदित्य व यशराज यांनी एकमेकांना घट्ट मिठय़ा मारल्याचे पाहावयास मिळाले. मोटारीच्या एका टायरमध्ये हवा नव्हती, बहुदा मोटारीचा टायर फुटून ती कालव्यात कोसळली असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.