वाहनमालकांकडून तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण कमी

शहरातून दररोज आठ ते नऊ वाहने चोरीला जात आहेत. वाहनचोरीबरोबरच चोरटय़ांकडून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे सुट्टे भागदेखील (स्पेअर पार्ट्स) लांबवले जातात. वाहनचोरी एवढय़ा सुट्टय़ा भागांच्या चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे फारशा दाखल होत नाहीत. किंबहुना सुटे भाग चोरीला गेल्यानंतर वाहनमालक तक्रार देण्याच्या फंदात पडत नाही. चोरटय़ांकडून वाहनांचे सुट्टे भाग भंगारमाल विक्रेत्यांकडे जमा केले जातात. त्या बदल्यात चोरटय़ांना शेपाचशे रुपये मिळतात. दुचाकी आणि चारचाकी वाहने लांबवण्याच्या चोरीत पकडले जाण्याची शक्यता जास्त असल्याने चोरटय़ांकडून वाहनांचे सुट्टे भाग लांबवले जातात. अशा प्रकारच्या गुन्हय़ांचा फारसा तपास होत नसल्याने चोरटय़ांकडून सुट्टे भाग लक्ष्य केले जातात.

गेल्या वर्षी पुणे शहर परिसरातून ३ हजार १९६ वाहने चोरीला गेली आहेत. वाहनचोरीचे वाढते गुन्हे पाहता अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी आहे. शहरातून चोरीला गेलेल्या प्रत्येक वाहनाचा छडा लागत नाही. चोरटे शहरातून चोरलेली दुचाकी वाहने परजिल्हय़ात करतात. त्यामुळे वाहनचोरीच्या तक्रारी दाखल करूनही वाहन परत मिळण्याची शाश्वती फार कमी असते. दुचाकी चोरल्यानंतर परजिल्हय़ात दहा ते पंधरा हजारांत विक्री केली जाते. चोरीची वाहने खरेदी करणारे शेतमजूर तसेच बांधकाम मजूर असतात. मजुरांकडून दुचाकीच्या कागदपत्रांबाबत फारसा पाठपुरावा केला जात नाही. कागदपत्रे आणून देतो, अशी बतावणी करून चोरटे मिळेल त्या किमतीत दुचाकी वाहनांची विक्री करतात. शहरातून दररोज आठ ते नऊ दुचाकी वाहने चोरीला जात आहेत. वाहनचोरीबरोबरच वाहनांचे सुट्टे भाग लांबवण्याचे प्रमाण मोठे आहे.

आलिशान मोटारींचे मोनोग्राम चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे. एका मोनोग्रामची किंमत पाच ते पंचवीस हजारापर्यंत असते. दोन वर्षांपूर्वी शहराच्या मध्यभागातून मोटारींचे मोनोग्राम चोरणाऱ्या शाळकरी मुलांना पकडले होते. मुलांनी मोटारीच्या मोनोग्रामची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मोटारी, दुचाकींचे आरसे, बॅटरी, डिक्की असे सुट्टे भाग चोरटय़ांकडून लांबवले जातात. नाना पेठ भागात जुने सुट्टे भाग खरेदी केले जातात. चोरटे सुट्टय़ा भागांची विक्री नाना पेठ भागातील व्यावसायिकांना करतात. सुट्टे भाग चोरीच्या तक्रारी दाखल होत नाहीत, त्यामुळे पोलिसांकडून अशा गुन्हय़ांचा फारसा गांभीर्याने तपास केला जात नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.