१२९ पैकी केवळ ४६ आधार केंद्रे कार्यान्वित

शहर आणि जिल्ह्य़ातील प्रत्येक बँकेने त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार केंद्र सुरू करावे, असे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्य़ातील बँकांनी आपापल्या शाखेत आधार यंत्रे कार्यान्वित करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले होते. बँकांनी २८ फेब्रुवारीपर्यंत १२९ यंत्रे सुरू करण्याबाबतही जिल्हाधिकारी राव यांनी बँकांना सांगितले होते. मात्र, बँकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे आधारकेंद्रे सुरू केलेली नसल्याचे चित्र असून गुरुवापर्यंत १२९ पैकी केवळ ४६ आधार केंद्रे बँकांमध्ये कार्यान्वित झाली आहेत.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार मोबाइल सीमकार्ड, बँक खाते, बँकांच्या माध्यमातून होणारे विविध व्यवहार, प्राप्तिकर विवरण, शाळा आणि महाविद्यालय, रुग्णालये अशा सर्वच ठिकाणी आधार कार्डची जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर बँकांनीही त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, असा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा अध्यादेशही केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याकरिता देशातील प्रत्येक जिल्ह्य़ासाठी केंद्र शासनाकडून १२९ आधार यंत्रे पुरविण्यात आली आहेत. मात्र, केंद्राच्या या निर्णयाला बँकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

केंद्र सरकारने हा उपक्रम सुरू केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्य़ासाठी १२९ आधार यंत्रे पुरविली आहेत. ही यंत्रे जिल्ह्य़ातील १२९ बँकांच्या शाखांमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राव यांनी २२ फेब्रुवारी रोजी बँकांची बैठक घेऊन याबाबतचे आदेश दिले होते. मात्र, आयडीबीआय बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल, आंध्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा, कॅथोलिक सिरीयन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अ‍ॅक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि बंधन बँक लि. अशा केवळ सोळा बँकांची मिळून ४६ आधार केंद्रे सुरू झाली आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..

सर्व बँकांच्या शाखांमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के (१२९) आधार यंत्रे कार्यान्वित करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा. स्वत:च्या खातेदारांबरोबरच इतर सर्वसामान्य नागरिकांची आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे करावीत. आधार यंत्र असलेल्या प्रत्येक बँक शाखेच्या बाहेर ‘सर्व नागरिकांची मोफत आधार नोंदणीची कामे केली जातील,’ असे फलक लावावेत, असे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये बँकांना दिले होते.