लाच घेतल्याच्या प्रकरणात तपास अधिकारी असलेले पोलीस निरीक्षक परशुराम पाटील यांना साक्ष देण्यासाठी गेली एक वर्ष नोटीस बजावूनही ते हजर न राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने वॉरन्ट काढले आहे. त्यांना खटल्याच्या सुनावणीच्या पुढील तारखेला हजर राहण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
पुणे कॅन्टोमेन्ट बोर्डाचे भूमी अभिलेख अधीक्षक नूतन वासुदेव गाडे यांना दीड हजार रुपयांची लाच घेताना पाटील यांनी २९ डिसेंबर २००७ मध्ये अटक केली होती. या प्रकरणी गाडे यांच्याविरुद्ध लाच घेतल्याच्या आरोपावरून न्यायालयात खटला सुरू आहे. गाडे यांच्याविरुद्ध पद्मावती विजय गुजर (वय ४२) यांनी तक्रार दिली होती. गुजर यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भूमी अभिलेख अधीक्षक असलेल्या गाडे याच्याकडे एका जमिनीच्या कामासंदर्भात त्या गेल्या होत्या. त्यांच्याकडे हे काम प्रलंबित होते. हे काम करण्यासाठी गाडे यांनी लाचेची मागणी केली. लाच द्यायची नसल्याने गुजर यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गाडे यांना दीड हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती.
 या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे. यामध्ये सर्व साक्षीदारांच्या साक्षी झाल्या आहेत. या गुन्ह्य़ाचे तपास अधिकारी असलेले पोलीस निरीक्षक परशुराम पाटील यांची साक्ष नोंदविण्याचे राहिले आहे. पाटील यांना न्यायालयाने एका वर्षांपासून साक्ष देण्यास न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, ते गेली एक वर्षे झाले तरी साक्ष देण्यास हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वॉरन्ट काढून हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पाटील हे सध्या हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहेत.