पुणे शहरात आज मुठा कालवा फुटल्याने पाणीच पाणी झाले होते. येथील काही भागाला पूराचे स्वरुप आल्याने शहराचा बराचसा भाग जलमय झाला होता. लाखो लिटर पाणी वाया गेल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर काहीसा ताण येणार आहे. या कालव्याच्या फुटलेल्या भागाची दुरुस्ती करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने पुणे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामध्ये लष्कर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होईल असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

कोंढवा, मुंढवा, महंमदवाडी, काळेपडळ, येरवडा, कोरेगावपार्क, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगांवशेरी, चंदननगर, नगररोड, विमाननगर या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. ही माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता प्रविण गेडाम यांनी दिली. आज शहरातील पर्वती आणि जनता वसाहत भागात आलेल्या पाण्यामुळे अनेक संसार उध्वस्त झाले. अनेकांची घरे आणि त्यातील सामान यामध्ये वाहून गेल्याने एकाएकी हे लोक रस्त्यावर आले. पालिकेकडून या लोकांसाठी तात्पुरता निवारा आणि अन्नपाण्याची सोय करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.