कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा; विद्यार्थ्यांची गैरसोय

टाइम्स उच्च शिक्षण क्रमवारीतील मानांकन उंचावल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठात कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने विद्यार्थ्यांना दैनंदिन वापराच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि कार्यालयांमध्ये पाणी वाटपाचे योग्य नियोजन नसल्याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात बरेचदा पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवतो. त्यात गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आली आहे. सध्या विद्यापीठाने नेहमीच्या पाणीपुरवठय़ाच्या जेमतेम २० टक्के पाणीपुरवठा होत आहे. त्याची झळ वसतिगृहांतील विद्यार्थी, विद्यापीठाच्या परिसरात राहणारे प्राध्यापक आणि सेवक चाळीतील कर्मचाऱ्यांना होत आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र, टँकरच्या पाणीपुरवठय़ालाही मर्यादा असल्याने दैनंदिन वापरामध्ये अडचणी येत आहेत. विद्यापीठ प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे काही विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रात पाण्याची समस्या नेहमीच होते. मात्र, अनेकदा हा प्रश्न मांडून त्या बाबत काहीच कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही. आठ महिन्यांपूर्वीही अशीच परिस्थिती ओढवली होती. त्यावेळी तात्पुरती उपाययोजना झाली. आता पहिल्यासारखीच स्थिती झाल्याचे विद्यार्थी म्हणाले.

पाण्याचा प्रश्न केवळ विद्यापीठात झालेला नाही, तर शहरात सर्वत्रच पाणी टंचाई आहे. विद्यापीठाकडून महापालिका प्रशासनाला या बाबत पत्र पाठवण्यात आले आहे आणि पाठपुरावाही करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत हा प्रश्न सुटेल.

– डॉ. एन. एस. उमराणी, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ