खडकवासला शंभर टक्के भरले, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ६३ टक्के पाणीसाठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये गेल्या सोळा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत चारही धरणांमध्ये १८.५० टीएमसी (अब्ज घनफूट) म्हणजेच ६३.४६ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून धरणातून टप्प्याटप्प्याने सायंकाळी सहा वाजेपर्यंत १८ हजार ४९१ क्युसेकपर्यंत मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. परिणामी भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ते सायंकाळी साडेपाचनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे शहराच्या मध्य भागात वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.

टेमघर धरणक्षेत्रात सोमवारी दिवसभर ६९ मिलिमीटर, वरसगाव ९५, पानशेत ७६ आणि खडकवासला धरण परिसरात ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चारही धरणांमध्ये आतापर्यंत १८.५० टीएमसी म्हणजेच ६३.४६ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण भरल्याने सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सकाळी आठ वाजता १ हजार ७१२ क्युसेक, दहा वाजता ३ हजार ४२४, दुपारी एक वाजता ५ हजार १३६, तीन वाजता ९ हजार ४१६, सायंकाळी पाच वाजता १३ हजार ९८१ आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत १८ हजार ४९१ क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. सध्या धरण क्षेत्रामध्ये संततधार सुरू असून असाच पाऊस सुरू राहिल्यास आणखी पाण्याचा विसर्ग नदीपात्रातून करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी १६ जुलै रोजी चारही धरणांत मिळून ११.२५ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. यंदा हा पाणीसाठा १८.५० म्हणजेच ७.२५ टीएमसीने अधिक आहे. कालव्यांमधून आणि बंडगार्डन बंधाऱ्यातून १ लाख १८ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत धरणे भरल्यानंतर खडकवासला धरणात पाणी सोडण्यात येते. या धरणाची क्षमता १.९७ टीएमसी एवढीच असल्याने आणि सद्य:स्थितीत हे धरण शंभर टक्के भरल्यामुळे मुठा नदीपात्रातून सोमवारी सकाळपासून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येत आहे. धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरू राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

खडकवासला धरणातून सोमवारी सकाळपासून पाणी सोडण्यात येत होते. मात्र, सायंकाळी विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने साडेपाच वाजता भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे शहराच्या मध्यभागात सर्वच पेठांमध्ये, जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता आणि स्वारगेट भागात वाहतूककोंडी झाली. गरवारे महाविद्यालयाची मागील बाजू, खिलारे वस्ती, ओंकारेश्वर आणि नेने घाट, पुलाची वाडी, कामगार पुतळा, नारायण पेठेतील अष्टभुजा मंदिर, डेंगळे पूल, वारजे, शिवणे, सीताबाग कॉलनी या ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते.

संपर्कासाठी व्यवस्था

नदीपात्रात पाणी सोडल्याने महापालिकेच्या वतीने  पूरनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. २५५०६८००/१२३४, २५५०१२६९ असा कक्षाचा क्रमांक असून हा कक्ष चोवीस तास कार्यान्वित करण्यात आला असून पाटबंधारे आणि पोलीस प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे. महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नदीकिनारच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रातील रस्त्यांवर, मोकळ्या जागेत वाहने लावू नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.