‘कुंडलिका-वरसगाव’साठी निधीचा अभाव

वाढते नागरीकरण आणि पाणीसाठय़ाचे मर्यादित स्रोत लक्षात घेऊन महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्यात आलेली कुंडलिका-वरसगाव पाणीपुरवठा योजना गुंडाळण्यात आली आहे. या योजनेसाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्यामुळे ही योजना गुंडाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. जलसंपदा विभागाने या योजनेचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) तयार केला होता. मात्र त्यापुढे या योजनेचे काम झाले नाही.

लवासा आणि अ‍ॅम्बी व्हॅलीपाठोपाठ मुळशी परिसरातील एका गिरिस्थान प्रकल्पासाठी खासगी धरण बांधण्यास राज्याच्या जलसंपदा विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. कुंडलिका नदीखोऱ्यात मुंबईतील एका खासगी कंपनीचा हा गिरिस्थान विकास प्रकल्प असून, त्यासाठी तीन दशलक्ष घनमीटर पाणीसाठा मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळाच्या स्थितीत खासगी धरण बांधण्यास मान्यता देण्याच्या जलसंपदा विभागाच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद सध्या उमटत आहेत. तसेच महापालिकेच्या कुंडलिका-वरसगाव या योजनेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. कुंडलिका नदीतून शहरासाठी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. मात्र एका गिरिस्थान प्रकल्पासाठी हा पाणीसाठा मंजूर झाल्याचे चित्रही यानिमित्ताने पुढे आले आहे.

वाढते नागरीकरण, महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट होऊ घातलेली गावे, मर्यादित जलस्रोत याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने कुंडलिका नदीतून वाया जाणारे पाणी अडवून ते वरसगाव धरणामध्ये आणण्याचे नियोजन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने केले होते. महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सन २०१७-१८च्या अंदाजपत्रकामध्ये तशी घोषणाही केली होती. या योजनेचा सविस्तर प्रकल्प आराखडा करण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात उपलब्ध करण्यात आली होती. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला प्राथमिक कामे करण्याचे आदेशही स्थायी समितीने दिले होते. मात्र प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीअभावी या महत्त्वाकांक्षी योजनेला गती मिळू शकली नाही.

‘कुंडलिका धरणातील वाया जाणाऱ्या पाण्याचा शहराला उपयोग करण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली होती. त्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा आणि अन्य प्राथमिक कामे करण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कामे प्राथमिक टप्प्यात सुरू असताना जलसंपदा विभागाने त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा केल्याची माहिती समजली. आराखडा करण्यासाठी नियुक्त केलेल्या सल्लागाराने या योजनेसाठी किमान आठशे ते एक हजार कोटी रुपये लागतील, असे स्पष्ट केले होते. खर्च मोठा असल्यामुळे या योजनेला गती मिळू शकली नाही,’ असे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

खासगी प्रकल्प मंजूर

मुळशी परिसरातील लवासा आणि अ‍ॅम्बी व्हॅली प्रकल्पांची उभारणी आणि या गिरिस्थान प्रकल्पांसाठी होत असलेल्या पाण्याच्या वापराबाबत सातत्याने टीका झाली आहे. मुळशी तालुक्यातच कुंडलिका नदीखोऱ्यातील गिरिस्थान प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर झाला होता. ५ हजार ९१४ एकर जागेवर हा गिरिस्थान प्रकल्प असून, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेही त्याला मान्यता दिली होती. या प्रकल्पासाठी तीन दशलक्ष घनमीटर पाणी बिगर सिंचनासाठी वापरण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य शासनापुढे होता. त्याला मान्यता देण्यात आली आहे. एकीकडे या पाणीवापराला मान्यता मिळत असताना पालिकेच्या उदासीनतेमुळे पाणीपुरवठा योजना मात्र प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही.