रिक्षा चालकांची आग्रही मागणी असलेल्या कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेबाबत बुधवारी विधान परिषदेत घोषणा करण्यात आली. पावसाळी अधिवेशनापूर्वी हे मंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासन घेईल, अशी घोषणा राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
आमदार मोहन जोशी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर ही घोषणा करण्यात आली. या घोषणेचे ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना कृती समिती व रिक्षा पंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची मागणी करण्यात येत होती. या मागणीला आता वैधानिक स्वरूप प्राप्त होऊ लागले असल्याचे सांगून याबाबत रिक्षा संघटनांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यासाठी केंद्रीय सामाजिक सुरक्षा कायदा, तामीळनाडूच्या धर्तीवर स्वतंत्र ऑटो रिक्षा कल्याणकारी मंडळ, बहुउद्देशीय वाहन मंडळ आदी तीन पर्याय शासनासमोर असल्याचे मुश्रीफ यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी त्याचे प्रारूप जाहीर करण्याचे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी त्या वेळी दिले.
कल्याणकारी मंडळाचा फायदा राज्यातील १० ते १२ लाख  रिक्षा चालकांना होणार आहे. पुणे व िपपरी-चिंचवडमधील दीड लाख रिक्षा चालकांना या प्रस्तावित मंडळाचा लाभ मिळू शकेल. विमा, वैद्यकीय योजना, घरांसाठी मदत, पेन्शन आदी फायदे या मंडळाअंतर्गत रिक्षा चालकांना मिळू शकणार आहेत.