|| बाळासाहेब जवळकर

पिंपरी पालिकेच्या वतीने मासूळकर कॉलनी येथे सुसज्ज नेत्र रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. नव्या वर्षांत हे नेत्र रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्राची सुविधा शहरवासियांना मिळणार आहे.

मासूळकर कॉलनीत (प्रभाग क्रमांक २८) या प्रकल्पाचे काम सुरू असून त्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्चपर्यंत सर्व काम पूर्ण होईल, त्यानंतर उद्घाटनासाठी हे नेत्र रुग्णालय सज्ज असेल, अशी माहिती स्थानिक नगरसेवक समीर मासूळकर यांनी दिली. या कामासाठी सुमारे २६ कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत बाह्य़ रुग्ण विभाग, सहा तपासणी कक्ष व दोन उपचार कक्ष आदी सुविधा आहेत. त्याचप्रमाणे, नेत्र रुग्णालयासाठी बाह्य़ रुग्ण विभाग, चार तपासणी खोल्या आणि दोन उपचार कक्ष तसेच अद्ययावत नेत्र सुविधा कक्ष, प्रतीक्षागृह आदी सुविधा असणार आहेत. पहिल्या मजल्यावर नेत्र शस्त्रक्रिया विभाग, रक्तसाठा कक्ष, डे केअर वॉर्ड आदी सुविधा असतील. दुसऱ्या मजल्यावर अद्ययावत प्रसूतिगृह व नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग असणार आहे. याशिवाय, इमारतीत दोन लिफ्ट, सीसीटीव्ही, अग्निशामक व्यवस्था, उपाहारगृह, बँक, प्रशस्त वाहनतळ, स्वच्छतागृह, शीतपेयजल, मेडिकल ऑक्सीजन पुरवठा कक्ष आदी विविध सुविधा असणार आहेत. येत्या तीन महिन्यात काम पूर्ण करून नागरिकांना हे रुग्णालय खुले करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.