14 October 2019

News Flash

सेवाध्यास : अध्ययन अक्षमतेवर मात करताना.. 

अभ्यासात मागे पडणारी मुले हा शाळांमधील शिक्षक आणि पालक या दोघांच्याही  नेहमीचा चिंतेचा विषय असतो

(संग्रहित छायाचित्र)

श्रीराम ओक

अभ्यासात मागे पडणारी मुले हा शाळांमधील शिक्षक आणि पालक या दोघांच्याही  नेहमीचा चिंतेचा विषय असतो. कोणत्याही प्रकारचे अपंगत्व किंवा सामाजिक,आर्थिक अशा कारणांमुळे मुले जेव्हा अभ्यासात मागे पडतात तेव्हा सर्वजण ते स्वीकारतात,  पण कोणत्याही प्रकारचे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक व्यंग किंवा अपंगत्व नसतानाही अभ्यासात मागे पडणारी मुले सर्वानाच बुचकळ्यात टाकतात.

या मुलांची बुद्धिमत्ता सर्वसाधारण, चांगली, उत्तम, अतिउत्तम असते आणि तरीही या मुलांना वाचन, लेखन आणि गणित ही मूलभूत शैक्षणिक कौशल्ये आत्मसात करायला अडचणी  येतात. मग या मुलांचे आता करायचे काय आणि कसे हा प्रश्न उभा राहतो. अशा मुलांसाठी डॉ. शांता वैद्य स्मृती प्रतिष्ठान कार्यरत आहे. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना पारंपरिक पद्धतीने शिकवलेले समजत नाही किंवा लक्षात राहात नाही. मेंदूच्या भिन्न कार्यपद्धतीच्या कारणांपैकी पहिले म्हणजे अनुवंशिकता तर दुसरे कारण म्हणजे जन्माच्या ऐन वेळची गुंतागुंत अशी कारणे यामागे असू शकतात. या मुलांमध्ये प्रचंड कल्पकता आणि कलात्मकता असते. त्यांची पर्यावरण, सामाजिक प्रश्न, त्याची उत्तरे याविषयीची जाणीव इतरांपेक्षा कितीतरीपट अधिक असते. त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण असतात. जगाच्या चौकटीबाहेरचा कलात्मक किंवा अत्यंत तर्कशुद्ध मूलभूत विचार  ही मुले करू शकतात. त्यामुळेच ती शास्त्रज्ञ, उद्योजक, नेते, कलाकार, खेळाडू, संगीतकार होऊ  शकतात. अशा मुलांसाठी डॉ. शांता वैद्य स्मृती प्रतिष्ठानचे काम अनौपचारिक स्वरूपात २००९ साली सुरू झाले, तर औपचारिक नोंदणी २०११ साली झाली. या मुलांना विशेष पद्धतीने शिकवले तर ही मुले केवळ लिहायला वाचायला शिकतात असे नव्हे तर शिक्षणात उत्तम प्रगती करू शकतात, पण केवळ या मुलांचे विशेष शिकवणी वर्ग घेऊ न प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यांच्या संगोपनात सहभागी असणारे पालक, इतर नातेवाईक, शिक्षक यांसारख्या मोठय़ांच्या दृष्टिकोनात बदल होण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबरीने मानसतज्ज्ञ, समुपदेशक, मनोविकारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, ऑक्युपेशनल थेरपिस्ट यासारखे विविध थेरपिस्ट अशा सर्वाचे सहकार्य मिळवण्याची गरज लक्षात आली. म्हणूनच प्रतिष्ठानने या मुलांचे विशेष शिकवणी वर्ग तर सुरू केलेच पण त्याचबरोबरीने पालक व शिक्षकांसाठी प्रशिक्षणदेखील दिले. आजपर्यंतच्या प्रशिक्षण वर्गात पुण्याबरोबरच विविध ठीकाणच्या दीड हजार शिक्षकांच्या तर एक हजार पालकांच्या कार्यशाळा संस्थेने आयोजित केल्या आहेत.

संस्थेच्या कामातून चारशे मुलांची शैक्षणिक प्रगती झालेली स्पष्टपणे दिसते आहे. त्यातून काही यशोगाथाही निर्माण होत आहेत. एकजण बारावी पूर्ण करून हॉटेल मॅनेजमेंट करत आहे, तर एकाला सहावीमध्ये भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत रजत पदक मिळाले आहे. एकजण राज्यनाटय़ स्पर्धामध्ये पारितोषिके मिळवत आहे, तर आणखी एकजण खेळामध्ये पुढे जात आहे. या काही मोजक्याच असल्या तरी त्या यशोगाथा असून त्यामध्ये पालकांच्या बरोबरीनेच शिक्षकांचाही बहुमूल्य वाटा आहे.

पाश्चिमात्य देशांमधील अभ्यासानुसार बालगुन्हेगार किंवा अलीकडे ज्यांना विधीसंघर्षयुक्त मुले म्हटले जाते त्यांच्यामधील ५०% मुले ही या गटात मोडणारी असतात. चांगली बुद्धिमत्ता आणि कोणतेही शारीरिक अपंगत्व नसतानाही समाजाने जे नाकारलेपण त्यांच्या मनात निर्माण केलेले असते त्यातून ही मुले गुन्हेगारीकडे वळतात असे हे अभ्यास सांगतात. भारतात असा विशिष्ट अभ्यास झालेला नसला तरी विधी संघर्षयुक्त मुलांची संख्या विचार करायला लावणारी आहे. ठं३्रल्लं’ उ१्रेी फीू१२ि इ४१ीं४, ट्रल्ल्र२३१८ ऋ ऌेी अऋऋं्र१२ च्या २०१५ मधील आकडेवारीनुसार, भारतात या मुलांची संख्या ४१ हजार ३८५  इतकी आहे आणि त्यातील फक्त ४ हजार ७५७ मुले संपूर्ण अशिक्षित आहेत, तर ३६ हजार ६२८ मुले ही प्राथमिक ते दहावीपर्यंतच्या शाळेचा अनुभव घेतलेली आहेत. या मुलांवर जर शाळेत असतानाच काम झाले तर बालगुन्हेगारांची संख्या कमी करता येऊ  शकते आणि समाजस्वास्थ्य अधिक नीट राहण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होऊ  शकतो. असा विचार करून संस्था आपले कार्यक्षेत्र विस्तारित करीत आहे.

२०१९-२० या शैक्षणिक वर्षांत संस्थेने मोठय़ा प्रमाणावर जनजागृती अभियान राबवायला सुरुवात केली आहे. यातून पुढे जाण्यासाठी कार्यकर्त्यांची एक चांगली फळी उभी राहते आहे. या कामाची व्यापक पार्श्वभूमी समाजाच्या लक्षात यावी, या मुलांना अगदी  लहान वयात मदत मिळावी आणि त्यातून त्यांचा प्रश्न सुटून ही मुले नुसती पास न होता त्यांच्या मूळ अंगभूत गुण, सामर्थ्यांच्या जोरावर यशोगाथा घडवत पुढे जावीत आणि स्वत:च्या बुद्धीने समाजात सकारात्मक योगदान देत राहावीत यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. संस्थेच्या या उपक्रमांत सहभागी व्हायचे असेल तर या ९८५०१४९९११ क्रमांकावर संपर्क साधता येईल असे संस्थेच्या संस्थापक सचिव क्षिप्रा रोहित यांनी सांगितले.

ज्यांच्या पालकांनी वस्तुस्थिती स्वीकारली आणि संस्थेबरोबर प्रयत्न सुरू केले त्यांच्यामध्ये नक्कीच प्रगती दिसून येते आहे.  त्यामुळेच ज्या मुलांपर्यंत डॉ. शांता वैद्य स्मृती प्रतिष्ठानसारख्या संस्था पोहचलेल्या नाहीत अशा सर्व मुलांपर्यंत पोहचायचे संस्थेचे ध्येय आहे, पण पोहचलेल्या संख्येपेक्षा पोहचू न शकलेली संख्या जास्त आहे. त्या दिशेने जाण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.

या मुलांच्या असणाऱ्या संख्येच्या मानाने समाजात या विषयाची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे विषयाची स्वीकार्हता नाही ही अडचण संस्थेला पावलोपावली जाणवत आहे. निरनिराळ्या शाळांमधून काम करताना पालकांना हा विषय समजावून सांगितला तरी या मुलांवर काम करण्यासाठी फक्त पन्नास पालकच तयार होतात. त्यांच्याशी बोलताना लक्षात आले की काही झाले तरी मुले दहावीपर्यंत पुढे जाणार आहेतच. मग कशाला चिंता करायची ही त्यांची मानसिकता चिंताजनक असून त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणण्याचे ध्येय प्रतिष्ठानसमोर आहे.

First Published on May 16, 2019 12:40 am

Web Title: while out on learning disabilities