दररोज सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कामकाज; सामान्यांना दिलासा

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक भुसार, गूळ, फळभाजी, कांदा-बटाटा विभाग करोनामुळे बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी, आडते, कामगार संघटनेकडून घेण्यात आल्यानंतर बाजार समितीकडून बाजार लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आपत्तीच्या काळात सामान्यांना झळ न पोहचण्यासाठी दी पूना र्मचट्स चेंबरकडून गुरुवारपासून गूळ आणि भुसार बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

बाजार बंद असल्याने भुसार, फळभाज्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून त्याची सामान्यांना झळ बसण्याची शक्यता आहे. बाजार घटकातील सर्वानी राष्ट्रीय आपत्तीच्या काळात बाजार सुरू करावा, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बुधवारी बाजार समितीच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दी पूना र्मचट्स चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते गूळ भुसार बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

या पुढील काळात भुसार बाजार सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत खुला राहणार आहे. मात्र, या काळात मार्केट यार्डातील किरकोळ विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे ओस्तवाल यांनी नमूद केले. दरम्यान, मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजार बंद असून मुंबईतील घाऊक बाजार सुरू करण्यात आला आहे. भाजीपाल्याच्या तुटवडय़ामुळे सामान्यांना झळ पोहचण्याची शक्यता आहे. याबाबत श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, घाऊक फळभाजी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईतील बाजाराचे कामकाज सुरू झाल्यानंतर मार्केट यार्डातील बाजार आवाराचे कामकाज सुरू करण्याबाबत येत्या एक ते दोन दिवसात आडते संघटनेकडून बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी कामगार  संघटनेकडून बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

टप्प्याटप्प्याने बाजार सुरू

मार्केट यार्डातील कामकाज चालविण्यासाठी बाजार समितीकडून उपाययोजना करण्यात येणार आहे. भुसार बाजाराचे कामकाज सुरू झाले असून लवकरच फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा विभागाचे कामकाज सुरू होईल. दिवसाआड फळभाजी विभागाचे कामकाज सुरू करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. टप्याटप्याने बाजारआवाराचे कामकाज सुरू ठेवण्याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारात होणारी गर्दीही कमी होईल आणि सामान्यांना झळ पोहचणार नाही, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

अफवांवर विश्वास नको; भाजीपाल्याचा पुरेसा साठा

सध्या बाजारात शहराची चार ते पाच दिवस गरज भागेल एवढा भाजीपाला उपलब्ध आहे. मोशी, खडकी येथील उपबाजाराचे कामकाज सुरू झाले आहे. मांजरी आणि गुलटेकडीतील मुख्य बाजाराचे कामकाज लवकरच सुरू होईल. अन्नधान्य, भाजीपाल्याचा पुरवठा नियमित होणार आहे. नागरिकांनी भाजीपाल्याची साठवणूक केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. बाजारात मर्यादित खरेदीदारांना प्रवेश देण्यात येणार असून बाजार घटकांतील सर्वाना ओळखपत्र तसेच गाडय़ांना लावण्यासाठी स्टिकर देण्यात येणार आहेत. भाजीपाला, अन्नधान्याचा पुरवठा नियमित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी साठेबाजी करू नये, असे देशमुख यांनी सांगितले.