सातव्या महिन्यात गर्भपात झाल्याचं पतीला सांगितलं नाही. एक चार महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण करून ती स्वतःची मुलगी असल्याचं पतीला दाखवायच होतं. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथून राणी शिवाजी यादव या महिलेला अटक केली असून अपहरण केलेल्या चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. धनश्री असे चार महिन्याच्या मुलीचे नाव आहे. तिच्या मूळ आई वडिलांचा अद्याप ठावठिकाणा नसून फिर्यादी राजेंद्र प्रभाकर नागपुरे हे तिचे पालक नसल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेड्या ठोकण्यात आलेली राणी शिवाजी यादव हिचा सातव्या महिन्यात गर्भपात झाला होता. हे तिच्या पतीला माहिती नव्हते. म्हणून तिने राजेंद्र प्रभाकर नागपुरे यांच्याकडे असलेल्या चार महिन्याच्या चिमुकलीचे चाकण परिसरातून अपहरण केले होते. आरोपी राणी ही काम शोधण्याचा बहाण्याने आली होती. राजेंद्र यांच्याकडे तिने काम मिळवलं आणि त्यानंतर धनश्री या चार महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण करून पसार झाली होती.

ही बाब समोर आल्यानंतर राजेंद्र यांनी चाकण पोलिसात फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून राणी यादव हिला बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील कुत्तर विहिर येथून अटक करून चिमुकलीची सुटका केली आहे. याप्रकरणी अद्याप संपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, चार महिन्याची चिमुकली ही फिर्यादी राजेंद्र यांची मुलगी नसल्याचं समोर आले आहे. ही बाब त्यांनी पोलिसांपासून लपवून ठेवली होती. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. धनश्री ही चिमुकली प्रेमसबंधातून एका खासगी रुग्णालयात जन्माला आलेली होती. फिर्यादी राजेंद्र नागपुरे यांचं आणि त्यांच्या पत्नीच नाव चिमुकलीचे आई वडील म्हणून टाकलं होतं. तेव्हा पासून नागपुरे दाम्पत्य हेच चार महिन्याच्या चिमुकलीचा सांभाळ करत होते. तरी, मूळ पालकांनी धनश्री ची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.