पुणे-लोणावळासह इतर रेल्वे मार्गावरील स्वच्छतागृहांबाबतही मागणी

पुणे : पुणे-लोणावळा मार्गावरील बहुतांश रेल्वे स्थानकांवरील महिलांसाठीची स्वच्छतागृह कुलूपबंद असल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा होत असल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून ‘लोकसत्ता’ने हा मुद्दा ऐरणीवर आणल्यानंतर स्थानकांवरील स्वच्छतागृहे खुली करण्यात येत आहेत. पुणे-लोणावळा मार्गाबरोबरच आता पुणे विभागातील पुणे-दौेंड आणि इतर मार्गावरही महिला स्वच्छतागृहे खुली करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

रेल्वेच्या पुणे विभागामध्ये सर्वात महत्त्वाचा असलेल्या पुणे-लोणावळा दरम्यान मळवलीपर्यंतची स्थानके पुणे रेल्वेच्या हद्दीत येतात. या मार्गावर विभागातील एकमेव उपनगरीय रेल्वे असून, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि नोकरदार महिला या सेवेचा लाभ घेतात. या मार्गावरील जवळपास सर्वच छोटय़ा-मोठय़ा स्थानकांवर काही दिवसांपूर्वी नव्याने स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. त्यात महिला आणि अपंगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. मात्र, खडकी, कामशेत, दापोडी, कासारवाडी, मळवली, बेगडेवाडी, घोरावाडी आदी विविध स्थानकांवर मागील वर्षभरापासून महिलांच्या स्वच्छतागृहांना कुलूप ठोकण्यात आले. त्यामुळे स्वच्छतागृह असूनही त्याचा उपयोग करता येत नाही. स्वच्छतागृहाअभावी  महिलांना कुचंबणा सहन करावी लागते. अगदीच अडचणीच्या काळात एखाद्या आडोशाचा आधार घ्यावा लागत असल्याची लाजिरवाणी स्थिती आहे.

रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांच्या वास्तवाबाबत ‘लोकसत्ता’मध्ये ठळकपणे वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या बाबत दखल घेतली आहे. त्यानुसार वृत्त प्रसिद्ध झाल्याच्याच दिवशी दापोडीसह इतर काही स्थानकांवरील महिलांच्या स्वच्छतागृहांची कुलपे काढली आहेत. महिलांच्या सोयीसाठी ही स्वच्छतागृहे चोवीस तास खुली ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा या बाबत म्हणाल्या, की पुणे-लोणावळा मार्गावरील काही रेल्वे स्थानकांवरील महिलांची स्वच्छतागृहे तातडीने खुली करून देण्यात आली आहेत. त्या बाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेतला आहे. मात्र, इतर मार्गावर अद्यापही महिला आणि पुरुषांच्या स्वच्छतागृहांना टाळे लावण्यात आले आहे. पुणे-दौंड मार्गावर पाटस, केडगाव, उरुळी, लोणी आदी स्थानकांवरील स्वच्छतागृहे बंद आहेत. पुणे-मिरज, पुणे-बारामती आदी मार्गावरही स्वच्छतागृहे बंद आहेत. काही ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा नाही. त्या बाबतही रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे.