हिंजवडीमध्ये एका कंपनीतील २३ कामगारांना मागील काही दिवसांपासून कामावर घेतले जात नसल्याने, हे कामगार दररोज कंपनीच्या गेटसमोरच ठिय्या देत आहेत. तर कंपनीकडून हे कामगार गैरहजर असल्याचे पत्र त्यांच्या घरी पाठवल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

या कामगारांनी मागील महिन्यात संघटना स्थापन केली आहे. तर संघटना स्थापनेचा रागातूनच कंपनीचे मालक आम्हाला कामावर घेत नसल्याचा आरोप कामगार (युनियन) संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाजीराव शिवाजी टाळके यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी कामगारांनी कामगार न्यायालयात देखील धाव घेतली आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कंपनीचे मालक विश्वास किरपेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.

हिंजवडीमधील फेज दोन येथे किरपेकर इंजिनिअरिंग प्रा.लि ही कंपनी आहे. या कंपनीत एकूण ७० कामगार काम करतात. मागील महिन्यात १५ ऑक्टोबर रोजी २३ कामगारांनी संघटना (युनियन) स्थापन केली, याची माहिती कंपनीचे मालक विश्वास किरपेकर यांना तीन दिवसांनी मिळाली, मात्र त्या अगोदरही त्यांना याबाबत कल्पना होती असं जनरल सेक्रेटरी टाळके यांनी सांगितलं आहे.

याशिवाय मागील काही दिवसांपासून कामगारांना कंपनीत घेतलं गेललं नाही.  सर्व कामगार दररोज येऊन कंपनीच्या गेट समोर थांबत आहेत. तर दुसरीकडे संबंधित कामगार गैरहजर असल्याचे सांगत कंपनी प्रशासनाकडून कामगारांच्या घरी पत्र पाठवले जात असल्याचे देखील टाळके यांनी म्हटले आहे.