News Flash

पेट टॉक : श्वानांची वार्षिक परीक्षा..

‘केनल क्लब ऑफ इंडिया’ (केसीआय) या संस्थेचा ‘डॉग शो’ ही श्वानांची परीक्षाच म्हणता येईल.

घरातील मुलाच्या परीक्षेच्या दिवशी सगळे घर कामाला लागलेले असते. दप्तर नीट भरलेले आहे ना, डबा घेतला ना, परीक्षेचे महत्त्वाचे मुद्दे लक्षात आहेत ना.. अशी धाकधूक पालकांना लागलेली असते. हीच ‘पालक’ म्हणून असलेली धाकधूक ‘श्वान पालक’ वर्षांतून किमान दोन वेळा अनुभवतात, ते ‘डॉग शो’ च्या निमित्ताने. शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धा किंवा परीक्षांच्या केंद्रावर असलेले वातावरणच थोडय़ाफार फरकाने ‘डॉग शो’च्या ठिकाणी दिसून येते. आपला श्वान नीट आहे ना, स्वच्छ आहे ना याची पालकांकडून होणारी पाहणी, कुत्र्याला प्रत्यक्ष शोच्या वेळी हाताळणाऱ्याला सूचना, गेल्या वेळी काय कमी पडले होते त्याची चाचपणी, आदल्या वर्षी पहिल्या आलेल्या श्वानाचे कौतुक, दबदबा आणि आज काय होणार याची उत्कंठा अशा वातावरणात डॉग शो म्हणजेच श्वानांची परीक्षा सुरू होते.

परीक्षा कशी होते?

‘केनल क्लब ऑफ इंडिया’ (केसीआय) या संस्थेचा ‘डॉग शो’ ही श्वानांची परीक्षाच म्हणता येईल. अगदी कालच्या रविवारी (२७ नोव्हेंबर) पुण्यासह मंगळूर, हैदराबाद, अलाहाबाद येथे ‘ऑल ब्रीड चॅम्पियनशिप’ आणि विशिष्ट प्रजातींसाठीही चॅम्पियनशिप असे डॉग शोज आयोजित करण्यात आले होते. केसीआयच्या नियंत्रणाखाली काम करणारे केनल किंवा केनाईन क्लब देशातील विविध शहरात आहेत. त्यांच्या माध्यमातून वर्षांला किमान दोन डॉग शोचे आयोजन करणे बंधनकारक असते. या डॉग शोमध्ये ‘चॅम्पियन’ ठरणाऱ्या कुत्र्यांना या श्वानजगतात भलताच मान असतो. श्वानाचे आरोग्य, वाढ, त्याची नीगा, स्वच्छता, आज्ञाधारकपणा, शो दरम्यान घेण्यात येणाऱ्या खेळांमध्ये त्याने केलेली कामगिरी अशा निकषांवर श्वानांचे परीक्षण होते. वर्षभर होणाऱ्या विविध डॉग शोमधील मिळालेले गुण एकत्र करून ‘वार्षिक विजेता श्वान किंवा चॅम्पियन’ जाहीर केला जातो. याशिवाय ‘बेस्ट इन क्ला’ प्रजातीतील सवरेत्कृष्ट श्वान किंवा बेस्ट इन ब्रीड, काही प्रजातींच्या गटातील सवरेत्कृष्ट ‘बेस्ट इन ग्रुप’ आणि बेस्ट इन शो अशीही प्रमाणपत्रे या श्वानांना दिली जातात. यासाठी क्लबकडून कडक नियमावलीही केली जाते. परीक्षेत कॉपी करणाऱ्या किंवा नियम मोडणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे पुढील परीक्षांना बसण्यासाठी मज्जाव केला जातो किंवा दंड केला जातो, त्याचप्रमाणे डॉग शोमध्येही नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाते. शोच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या श्वानांना पुढील काही डॉग शोमध्ये सहभागी होण्यासाठी बंदीही घातली जाते.

डॉग शोचा इतिहास

डॉग शो ही संकल्पनाही इंग्रजांनी भारतात आणली. साधारण १९८६ मध्ये भारतात ‘द नॉर्थन इंडियन केनल असोसिएशन’ ही संस्था सुरू झाली. त्यानंतर या संस्थेचे नाव बदलून ते ‘इंडियन केनल असोसिएशन’ असे करण्यात आले. त्यावेळी ही संस्था ‘केनल क्लब ऑफ लंडन’शी संलग्न होती. साधारण १९०७ सालापासून भारतात ‘डॉग शो’ सुरू झाल्याच्या नोंदी आहेत. त्यावेळी भारताचा भाग असलेल्या आणि पाकिस्तानात असलेल्या लाहोरमध्ये हा शो आयोजित करण्यात आला होता. १९२७ मध्ये ‘केनल क्लब ऑफ इंडिया’ ही संस्था उदयाला आली आणि या संस्थेच्या आखत्यारित देशातील डॉग शोज सुरू झाले. या संस्थेच्या अखत्यारीतील पहिला शो देखील लाहोर येथेच घेण्यात आला होता. त्यानंतर दिल्ली हे डॉग शोचे केंद्र बनले. स्वातंत्र्यानंतर देशातील विविध शहरांमध्ये डॉग शो आयोजित करण्यात येऊ लागले.

श्वानपरीक्षेचे आयोजक

श्वानप्रेमींमध्ये ‘डॉग शो’च्या आयोजनासाठी केसीआयची ओळख असली तरीही शास्त्रीय पद्धतीने श्वानांचे ब्रीडिंग करून श्वानांच्या अधिक चांगल्या, सशक्त आणि गुणवान पिढय़ा निर्माण व्हाव्यात हा या संस्थेचा मूळ उद्देश. त्या अनुषंगाने ब्रीडर्ससाठी नियमावली तयार करणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, प्रशिक्षण देणे ही कामेही ही संघटना करत आली आहे. माणसांना पूर्वजांची पुण्याई कामी येते म्हणतात. त्याचप्रमाणे श्वानांनाही त्यांच्या पूर्वजांवरून जोखले जाते. हा पूर्वश्वानांच्या कामगिरीचा लेखाजोखा लक्षात घेऊन पिल्लांचा सध्याचा बाजारभाव ठरत असतो. विविध प्रजातींच्या श्वानकुळांचे तपशील सांभाळण्याचे काम करते. कुत्र्यांचे ब्रीडिंग, विक्री याबाबत नियंत्रण ठेवणारी देशातील ही अधिकृत संस्था आहे. कुत्रे विकत घेण्यासाठी जाहिराती किंवा ब्रीडर्सचा शोध सुरू झाला की कुत्रे घेताना ‘केसीआय’ नोंदणी असलेले अशी श्वानाची ओळख समोर येते. या संस्थेने ‘प्युअर ब्रीड’ किंवा चॅम्पियन डॉग म्हणून दिलेले प्रमाणपत्र हा श्वान बाजारपेठेतील अंतिम शब्दच मानला जातो. त्यामुळेच अशा केसीआय नोंदणी असलेल्या श्वानांची किंमतही जास्त असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 3:56 am

Web Title: yearly physical exam for dog
Next Stories
1 पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी
2 नियमबाहय़ वेतनवाढीची वसुली करण्याची विद्यापीठाकडून केवळ हमी
3 यूपीए व काँग्रेसच्या काळात ‘संघटित दरोडय़ा’ची परिकाष्ठा- पीयूष गोयल