अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची फिर्याद दिल्याचा राग आणि राहत्या इमारतीतील लोकांना भडकाविल्याचा राग मनात धरून तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून एकाचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांला मारहाण करून चालत्या गाडीतून फेकून दिले. पोलिसांनी चार तासात माग काढून तीन आरोपींना गणेश पेठ येथील उतारा चौक येथून जेरबंद केले. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (१६ मार्च) ही घटना घडली.
रज्जाक मुनीर शेख (वय ४०), फिरोज हमीद शेख (वय २३, दोघे रा. केदार इमारत, मंगळवार पेठ) आणि मझर मुराद खान (वय ३०, रा. घोरपडी, मुंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, या प्रकरणी नासीर इब्राहिम शेख (वय ४२, रा. केदार इमारत, मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासीर यांनी फिरोज याच्या भावाने मंगळवार पेठ येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच नासीर यांनी रज्जाक आणि फिरोज यांच्याविरोधात स्थानिक रहिवाशांना भडकावल्याचा राग त्यांच्या मनात होता. नासीर हा रज्जाकचा खून करणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी नासीर यांना त्यांच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून पळवून नेले. या तिघांनी त्यांना हडपसरमार्गे उरळीकांचन येथे नेले. हा प्रकार सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास घडला.
आरोपी नासीर यांना एका निजर्नस्थळी घेऊन गेले. त्या ठिकाणी या तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. तसेच अंगावरील कपडे काढून टाकले. एवढय़ावरच न थांबता या तिघांनी त्यांच्या अंगावर लघुशंकाही केली. नासीर यांच्या तोंडामध्ये धारदार शस्त्र घुसवून गंभीर जखमी केले आणि त्यांच्या तोंडावरही वार करीत त्यांचे दातही तोडले. या सर्व प्रकारानंतर आरोपींनी नासीर यांना चालत्या गाडीतून रेसकोर्स येथे बाहेर फेकून देत तेथून ते पसार झाले. हा प्रकार नासीर यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात येऊन सांगितला. सहायक पोलीस निरीक्षक खेडकर यांनी त्यांचा जबाब घेऊन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासासाठी पथकही तयार केले. दरम्यान तपास पथकातील कर्मचाऱ्याला खबऱ्यामार्फत या आरोपींची माहिती समजली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून अवघ्या चार तासात आरोपींना गणेश पेठ येथून अटक केली. तसेच या गुन्ह्य़ात वापरलेली मोटारही ताब्यात घेण्यात आली आहे.