समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्या मित्र-मैत्रिणींना समाजमाध्यमातून एकत्र आणत दिवा फाउंडेशन सुरू झालं. विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना सामाजिक कर्तव्यांची जाणीव करून देणं, महाविद्यालयीन तरुणांमध्ये सामाजिक प्रश्नांबाबत कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांची जाणीव निर्माण करणं असा प्रयत्न केला जातो. दिवा फाउंडेशन स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत तीन वर्षांमध्ये प्रसंगी रस्त्यावर उतरून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. विविध संस्थांना मदत करण्याचेही उपक्रम करण्यात आले.

आपल्या आजूबाजूला असलेली वंचित मुलं, माणसं, त्यांची होणारी आबाळ, घडणारे अनुचित प्रकार बघताना यावर उपाय म्हणून आपण काहीतरी करायला हवं असं अनेकांना विशेषत: तरुण वर्गाला वाटत असतं, पण काहीतरी म्हणजे नेमकं काय, याचं उत्तर एकटय़ाने शोधून सापडत नाही. अमोल घोलप आणि त्याच्या मित्रमंडळींसाठी काहीतरी म्हणजे काय हे उत्तर शोधून देण्यात समाज माध्यमांनी म्हणजेच तुमच्या आमच्या सगळय़ांच्या आवडत्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपनं मोलाची मदत केलीय. रस्ते सुरक्षा असो की दुष्काळ, वाहतुकीचे नियम पाळण्याचा मुद्दा असो की सार्वजनिक कार्यक्रमांमधून होणारी अन्नाची नासाडी.. अशा अनेक प्रश्नांवर अनेक समविचारी तरुण मुलं-मुली एकत्र आले तर नक्की फरक पडेल या विचारानं २०१५ मध्ये पुण्यातल्या काही तरुणांनी एकत्र येऊन दिवा फाउंडेशनची स्थापना केली.

अमोल घोलप सांगतो, सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण धावत असतो. सगळय़ांनाच एवढी घाई असते की वाहतुकीचे नियम न पाळणं, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता न राखणं, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपण काही देणं लागतो हे लक्षातच न राहणं अशा गोष्टी होतात. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रति आपलं काही कर्तव्य आहे हे विसरून जायला होतं.

हे जाणवलेल्या, याबद्दल काही करू इच्छिणाऱ्या मित्र-मैत्रिणींना समाजमाध्यमातून एकत्र आणत दिवा फाउंडेशन सुरू झालं. त्यामार्फत सामाजिक कर्तव्याची जाणीव नागरिकांना करून देणं, महाविद्यालयीन तरुण पिढीत अशा प्रश्नांविषयी कर्तव्य, जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दिवा फाउंडेशन स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत तीन वर्षांमध्ये प्रसंगी रस्त्यावर उतरून नागरिकांमध्ये जनजागृती करणे, संस्थांना मदत करणे असे अनेक उपक्रम पार पाडले. वाटल्यामुळे आनंद वाढतो, आपलीही भरभराट होते. त्यामुळे गरजूंना आपला मदतीचा हात देऊ न त्यांना आपल्या बरोबरीने पुढे नेण्याचं आवाहन दिवा फाउंडेशनतर्फे केलं जातं.

पाश्चात्त्य संस्कृतीचा आपल्यावर भरपूर प्रभाव आहे. अगदी वाढदिवस साजरा करण्याची पद्धतही पाश्चात्त्य पद्धतीनं घेतली आहे. अशा गोष्टींऐवजी समाजातल्या गरीब आणि उपाशी मुलांना अन्नदान करणं, त्यांच्या निरोगी आरोग्याबाबत जनजागृती करणं अशा नवीन गोष्टींचा पायंडा दिवा फाउंडेशनतर्फे पाडला जात असल्याचंही अमोल सांगतो.

जुने कपडे नकोसे झाल्यानंतर फेकून न देता ते ‘दिवा’कडे आणून दिले तर ते गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवले जातात. वाढदिवसाला होणाऱ्या खर्चातून एखाद्या संस्थेला भेट देणं, तिथल्या मुलांना खाऊ देणं, संस्थेला गरजेची अशी एखादी वस्तू भेट देणं अशा छोटय़ा गोष्टी करून सामाजिक बांधिलकी जपण्याची सवय लागते. एकाच्या प्रेरणेतून दुसराही आपला खारीचा वाटा उचलतो आणि असंच काम पुढे जातं हे दीपक पाटील आणि रोहित जगताप आवर्जून सांगतात. अमोल सांगतो, काम सुरू झालं तेव्हा आम्ही अवघे १० सदस्य होतो. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप मुळे आता ही संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. ‘दिवा’ फाउंडेशनला लोकांपर्यंत पोहोचवण्यात समाज माध्यमाचं योगदान मोठं आहे, कारण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अनेक वयोगटांतल्या लोकांपर्यंत सहज पोहोचता येतं. म्हणूनच कुठलंही सकारात्मक काम उभं करायचं असेल तर समाज माध्यम हे उत्तम व्यासपीठ असल्याचं आता समोर येत आहे.

संस्थेच्या अधिक माहितीसाठी किंवा सहभागी होण्यासाठी ९८६००३९९६२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.