बंदी असलेल्या औषधाचा वापर करून घरामध्ये ‘पेस्ट कंट्रोल’ केल्याने शनिवार पेठेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ‘पेस्ट कंट्रोल’ करणाऱ्या कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
आकाश राजकुमार म्हेत्रे (वय १८, रा. घर क्रमांक ६०५, शनिवार पेठ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अदित्य पेस्ट कंट्रोलचा मालक अमित विलास गालिंदे (वय ३०, रा. पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार पेठेतील घरक्रमांक ६०५ मध्ये आकाश मित्रासोबत राहत होता. मित्र सुट्टीसाठी गावाकडे गेले होते. २१ ऑॅक्टोंबर रोजी घरात ‘पेस्ट कंट्रोल’ केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आकाश एकटाच त्या घरात झोपला. रात्री त्याला चक्कर येऊन उलटय़ांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास सुरु होता. आकाश राहत असलेल्या खोलीमध्ये आदित्य पेस्ट कंट्रोल कंपनीकडून पेस्ट कंट्रोल केले होते. त्या ठिकाणचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानुसार पेस्ट कंट्रोलसाठी आदित्य पेस्ट कंट्रोल कंपनीने अॅल्युमिनियम फॉस्फाईड या बंदी असलेल्या विषारी औषधाचा ढेकूण, झुरळ मारण्यासाठी ‘पेस्ट कंट्रोल’ म्हणून निष्काळजीपणे वापर केल्याचे आढळून आले. त्या विषारी औषधाच्या वासाने आकाशला त्रास होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पेस्ट कंट्रोल कंपनीच्या मालकास अटक केली असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. जी. पाटील हे अधिक तपास करीत आहेत.