पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन वर्ष झाले तरीही भाजपाने दिलेले एकही आश्वासन पाळलेले नाही. अनधिकृत बांधकामांवरचा शास्तीकर पूर्णपणे माफ करू असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अनधिकृत बांधकामांवर दंडात्मक कारवाई करत मिळकत कराच्या व मिळकत जप्तीच्या नोटीसाही बजावल्या जात आहेत. रिंगरोडच्या नावाखाली गरीबांच्या घरांवरून बुलडोझर फिरवला जातो आहे. २४ तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन असताना पाणीपट्टीत चौपट दरवाढ करण्यात आली आहे. याच सगळ्या गोष्टींविरोधात युवक राष्ट्रवादीने आंदोलन केले.

‘नागपूरचा पोपट काय म्हणतोय, शास्तीकर माफ करणार नाही म्हणतोय’, ‘अनधिकृत बांधकाम प्रश्नाचे काय झाले ?’, ‘रिंग रोडचे काय झाले ?’, ‘चोवीस तास पाणीपुरवठ्याचे काय झाले ?’, ‘कचरा मुक्त शहराचे काय झाले ?’, ‘बोपखेलच्या पुलाचे काय झाले ?’, ‘निगडीपर्यंत मेट्रो नेण्याचे काय झाले ?’, ‘घरकुलचे काय झाले ?’, ‘हॉकर्स झोनचे काय झाले ?’, ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा असे म्हणणा-यांच्या पारदर्शक कारभाराचे काय झाले ?’ अशा सगळ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक अवतार यावेळी महापालिकेत बघायला मिळाला. शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्त्वाखाली प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली. . यावेळी ज्येष्ठ नगरसेविका मंगलाताई कदम, अपर्णा डोके, सुमनताई पवळे, गिता मंचरकर, विनया तापकीर, नगरसेवक राजू मिसाळ, माजी नगरसेवक काळूराम पवार,आदींसह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.निदर्शने संपल्यानंतर वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन दिले.