पुण्यातील ग्राहक मंचाने एका हॉटेलला चक्क ५५ हजारांचा दंड ठोठावला आहे. झोमॅटो या फूड डिलेव्हरी अॅप्लिकेशनवरुन एका ग्राहकाने पनीर असलेल्या पदार्थाची ऑर्डर दिलेली असताना या हॉटेलने मांसाहारी पदार्थ (चिकन) या व्यक्तीच्या घरी पाठवल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला. विशेष म्हणजे हॉटेलकडून ही चूक एकदा नाही दोनवेळा घडल्याने संतप्त झालेल्या ग्राहकाने ग्राहक मंचाकडे तक्रार केल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली.

षण्मुख देशमुख असे तक्रारदार ग्राहकाचे नाव असून ते मूळचे नागपूरचे आहेत. पेशाने वकील असणाऱ्या षण्मुख यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी ३१ मे रोजी प्रित पंजाबी स्वाद या हॉटेलमधून झोमॅटोवरून पनीर मसाला या डिशची ऑर्डर दिली होती. मात्र झोमॅटोवरून पदार्थ घरी आल्यानंतर तो खाल्ल्यावर षण्मुख यांना तो पदार्थ पनीर नसून चिकन असल्याचे समजले. दोन्ही पदार्थ दिसायला सारखेच असल्याने डिलिव्हरी बॉयने आणून दिलेला पदार्थ मांसाहारी पदार्थ असेल याचा अंदाज आला नाही आणि मी तो खाल्ल्याचे षण्मुख म्हणाले. संबंधित प्रकार षण्मुख यांनी हॉटेलला फोन करुन कळवल्यानंतर हॉटेलने घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच पनीर मसाला दिलेल्या पत्त्यावर पाठवत असल्याचे षण्मुख यांना सांगितले.

हॉटेलने दिलेल्या आश्वासनानुसार काही वेळातच षण्मुख यांना दुसरी ऑर्डर मोफत देण्यात आली. मात्र यावेळीही पनीर मसालाऐवजी बटर चिकन हा पदार्थ हॉटेलने पाठवला होता. त्यामुळे षण्मुख चांगलेच संतापले आणि त्यांनी याबद्दल ग्राहक मंचाकडे तक्रार केली. मांसाहारी पदार्थ पाठवल्याने आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून यासाठी हॉटेल आणि झोमॅटो जबाबदार आहे. घडलेल्या प्रकारासाठी मला पाच लाखांची नुकसान भरपाई आणि जो मनस्ताप झाला त्याचा मोबदला म्हणून एक लाख रुपये देण्यात यावे असे षण्मुख यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते.

ग्राहक मंचाच्या सुनावणीदरम्यान झोमॅटोने या सर्व प्रकरणामध्ये आमची काहीच चूक नसून हॉटेलने संबंधित ग्राहकाला चुकीचा पदार्थ पाठवल्याचे नमूद केले. तसेच देशमुख यांचे पैसेही झोमॅटोने परत केले असल्याने केवळ बदनामीच्या उद्देशाने आम्हाला या प्रकरणात अडकवले जात असल्याचे झोमॅटोने ग्राहक मंचासमोर आपली बाजू मांडताना सांगितले. दुसरीकडे हॉटेल व्यवस्थापनाने त्यांच्याकडूनच ही चूक झाल्याचे मान्य केले. मंचाने हॉटेल आणि झोमॅटोला देशमुख यांना ५० हजारांची नुकसान भरपाई आणि मानसिक त्रास झाला त्याबद्दल पाच हजारांची भरपाई अशी एकूण ५५ हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.