शालान्त परीक्षेच्या बीजगणिताच्या प्रश्नपत्रिकेतील ४० पैकी १० गुणांचे प्रश्न हे पाठय़पुस्तकाच्या बाहेरचे असल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा मंगळवारी उत्तरपत्रिका लिहिताना मोठा गोंधळ झाला. या प्रकाराबाबत अनेक पालकांनी तक्रारी केल्या असून या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचाही दावा केला जात आहे. सर्व विद्यार्थ्यांना या विषयात १० गुण देण्यात यावेत आणि झालेल्या चुकीची गांभीर्याने चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शालान्त परीक्षा गेल्या आठवडय़ात सुरू झाली असून मंगळवारी बीजगणिताची परीक्षा होती. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप झाल्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेतील १० गुणांचे प्रश्न हे पाठय़पुस्तकाच्या बाहेरचे होते. या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ झाला. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याबाबत पालकांना माहिती दिली. अनेक पालकांनी त्यानंतर शाळांकडे तसेच परीक्षा मंडळाकडे दूरध्वनी करून तक्रारी केल्या. प्रश्नपत्रिकेतील चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. सहा वर्षांपूर्वीच्या पाठय़पुस्तकातील हे प्रश्न असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. या चुकीच्या व पाठय़पुस्तकाबाहेरील प्रश्नांसाठीचे पूर्ण १० गुण विद्यार्थ्यांना द्यावेत अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. मात्र हे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे नव्हते असा दावा काही शिक्षकांनी केला आहे.
या प्रकाराबाबत भारतीय जनता पक्षाने शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अशा गोष्टींचा दूरगामी परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांना १० गुण द्यावेत आणि या प्रकाराची गांभीर्याने चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
शालान्त परीक्षा मंडळाकडे याबाबत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र मुख्य परीक्षकांच्या अहवालानंतर चूक झाली किंवा कसे ते स्पष्ट होईल.
– कृष्णकुमार पाटील, सचिव, राज्य परीक्षा मंडळ