लोहमार्ग अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांची कारवाई

पुणे : कडक निर्बंधांमुळे आपापल्या गावी परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांना धमकावून लुबाडणाऱ्या ११ पोलिसांची बुधवारी तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी चित्रीकरणाच्या पूर्ण पुराव्यासह तक्रार केल्यानांतर ही कारवाई करण्यात आली.

रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी उचललेल्या या कडक पावलामुळे  पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे, शहरात निरनिराळ्या व्यवसायातून उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो मजुरांनी आपापल्या गावाचा रस्ता धरला. त्यामध्ये, ७० टक्क्य़ांहून अधिकजण बिहार आणि उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. रोजगाराचे साधन न उरल्याने नाइलाजास्तव  या श्रमिकांनी कुटुंबीयांसमवेत रेल्वेद्वारे  गावाची वाट धरली आहे. हाताशी असलेल्या तुटपुंज्या पैशांसमवेत निघालेल्या या मजुरांना स्थानकावर  लुटले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. नगरसेवक मोरे यांनी गेले दोन दिवस कार्यकर्त्यांसमवेत स्थानकावर जाऊन पाळत ठेवली. तेव्हा काही रेल्वे पोलीसच प्रवाशाना लुबाडत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले.

फलाट  क्रमांक तीनजवळ राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराचे त्यांनी गुप्तपणे चित्रीकरण केले.  तिकीट आणि आरक्षण नसल्याचे कारण दाखवून पोलीस ही लूटमार करीत होते. मोरे यांनी चित्रीकरण सादर करीत या सर्व प्रकरणाची रीतसर तक्रार केली. प्राथमिक तपासामध्ये दोषी आढळलेल्या ११ पोलिसांची थेट मुख्यालयात बदली करण्यात आली.

गरीब प्रवाशांकडून पोलिसांनी पैसे काढून घेणे हा खूप गंभीर प्रकार आहे. केवळ बदली करून चालणार  नाही,तर  त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे, असे  विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य निखिल काची यांनी सांगितले.