तानाजी काळे, लोकसत्ता

इंदापूर : ऐन पावसाळ्यात उजनी धरणामध्ये केवळ १३ टक्के पाणीसाठा जमा झाला असून, उपयुक्त पाणीसाठ्यात केवळ सात अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी धरण शंभर टक्के भरले होते. उजनी धरणाच्या सर्व मोऱ्यांमधून अतिरिक्त पाणी सोडण्यात येऊन त्या उसळत्या पाण्यावर राष्ट्रध्वजाच्या तिरंगा रंगाची विद्युत रोषणाई केल्याने उजनी धरणावर नवचैतन्य ओसंडून वाहत होते. मात्र, यावर्षी उजनी धरणात केवळ १३ टक्के पाणी जमा झाले असल्याने उजनीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमधून तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात
Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
Yavatmal lashed by stormy rain early morning Water in low lying areas
यवतमाळला भल्यापहाटे वादळी पावसाचा तडाखा; सखल भागात पाणी
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?

हेही वाचा >>> पुणे : लोकअदालतीत तडजोडीसाठी ७५ हजार ४०४ दावे

उजनी धरणाबरोबरच इंदापूर तालुक्यातून वाहणारी नीरा नदीही कोरडीठाक पडल्याने या नदीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात पाऊस कमी प्रमाणात झाल्यास मोठ्या दुष्काळाला तोंड द्यावे लागेल. या चिंतेने शेतकरी आत्ताच चिंतातूर झाला आहे.

उजनी धरणामध्ये गतवर्षी १५ ऑगस्टपूर्वीच शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला होता. गेल्या वर्षी सर्वत्रच पर्जन्यमान चांगले असल्यामुळे रब्बी हंगामात पाण्याचा कमी वापर होऊन जानेवारी महिन्यापर्यंत उजनी धरणामध्ये शंभर टक्के पाणी जसेच्या तसे होते. मात्र, या पाणीसाठ्यातील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जानेवारी ते मार्च- एप्रिल दरम्यान वापरण्यात आले. नदीपात्रातूनही पंढरपूरसाठी पाणी सोडण्यात आल्याने उजनी धरणातील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होऊन ऐन उन्हाळ्यात हा पाणीसाठा उणे ३६ टक्क्यांपर्यंत घसरला होता.

आतापर्यंत झालेल्या पर्जन्यमानात धरणातील पाणीसाठा उणे पाणीसाठ्यातून अधिकमध्ये आला. मात्र, त्याचवेळी उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस मंदावल्याने उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी कमी झाले. उजनी धरणाबरोबरच तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरलेली नीरा नदी आणि त्यावरील बंधारे कोरडे पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच सध्या नीरा नदीवर असणाऱ्या जवळपास सर्वच धरणांमध्ये जवळपास नव्वद टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नीरा नदीत पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा >>> चांदणी चौकात भुलभुलैया!; दिशादर्शक फलकांअभावी वाहनचालकांमध्ये गोंधळ

प्रति वर्षी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस हा १५ ऑगस्टपर्यंत कमी होत असतो. त्यामुळे नीरा नदीवरील सर्व बंधारे धापे टाकून पाण्याने पूर्ण भरून घेतले जातात. मात्र, यावर्षी अद्याप नीरा नदीत पाणी सोडले गेले नसल्याने नीरा नदी आणि त्यावरील बंधारे सध्या कोरडे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली सध्या शेतात उभी असलेली पिके वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. नदीत पाणी नसल्याने नीरा नदी परिसरातील इंदापूर तालुक्यातील गावच्या पाणीपुरवठा योजनांवर याचा परिणाम काही प्रमाणात होत आहे.

धरण परिसरातील पाऊस साधारणपणे ऑगस्ट महिन्यात उघडतो. प्रतिवर्षी जूनपासूनच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नीरा नदीत पाणी सोडले जाते. त्यामुळे प्रतिवर्षी नदी आणि त्यावरील बंधारे हे पूर्ण क्षमतेने भरलेले असायचे. परंतु, या पावसाळ्यात नीरा नदीत प्रतिवर्षीप्रमाणे पाणी न सोडल्याने सध्या नीरा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. ऑगस्ट महिन्यात जलसंपदा विभागाने पाणी सोडले नाही तर यापुढील काळात शेतकऱ्यांना आपली पिके कशी जगवायची असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने नीरा नदीत तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.