मोटार पाठीमागे घेत असताना पोलीस निरीक्षकाच्या मोटारीखाली सापडून तेरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.
सचिन बबन सिंग (वय १३, रा. माणिकबाग) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्रीकांत दिगंबर खोचे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोचे हे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) मध्ये फिंगर प्रिन्ट ब्युरोमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकबाग येथे शुक्रवारी सकाळी खोचे आपली मोटार पाठीमागे घेत होते. त्या वेळी मोटारीमागे सचिन सापडल्याने तो खाली पडून जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सचिनचा मृत्यू झाला. सचिनच्या वडिलांचे एक वर्षांपूर्वी निधन झाले असून आई धुणी-भांडय़ाचे काम करते. तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता.