राज्यात १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी

पुणे : परीक्षा कक्षात वेळेत पोहोचण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धावपळ.. प्रश्नपत्रिका अवघड असेल की सोपी सर्वानाच पडलेला प्रश्न..परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची सुरू असलेली लगबग.. परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर थांबलेले पालक.. पहिल्या पेपरनंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित.. असे वातावरण मंगळवारी शहरातील ठिकठिकाणच्या बारावीच्या परीक्षा केंद्रांवर दिसले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा राज्यभरात सुरू झाली. या परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. इंग्रजी विषयाने परीक्षेची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण येऊ नये यासाठी काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना ओवाळण्यात आले. ‘इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील उताऱ्याचे प्रश्न वगळता उर्वरित प्रश्न सोपे होते, प्रश्नपत्रिकेत कोणत्याही चुका आढळल्या नाहीत, सर्वसाधारणपणे गेल्या वर्षीप्रमाणेच प्रश्नपत्रिका होती, पुरेसा अभ्यास केला असल्यास किमान उत्तीर्ण होण्यात काहीच अडचण नाही,’ असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, पाल्याला परीक्षेला सोडण्यासाठी अनेक पालक दुचाकी आणि मोटार घेऊन आल्याने रस्त्यांवर कोंडीसदृश स्थिती निर्माण झाली होती.

पहिल्याच दिवशी ८२ गैरप्रकारांची नोंद

राज्य मंडळाकडून परीक्षेत गैरप्रकार न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलेले असूनही राज्यभरात पहिल्याच दिवशी ८२ गैरप्रकारांची नोंद झाली. नऊ विभागीय मंडळांमध्ये सर्वाधिक ३४ गैरप्रकार लातूर विभागीय मंडळात नोंदवले गेले आहेत. त्या खालोखाल नाशिक विभागीय मंडळात १८ गैरप्रकार झाले.