पुणे विद्यापीठामध्ये या वर्षीपासून सुरू झालेल्या वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाला आलेल्या अर्जामध्ये रुपयाच्या घसरणीमुळे परिणाम झाला असला, तरीही पहिल्याच वर्षी तब्बल १५० विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा दिली आहे.
जर्मनीतील एफएफएल इन्स्टिटय़ूटच्या सहकार्याने पुणे विद्यापीठामध्ये या वर्षीपासून वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम (एमटेक एव्हिएशन) सुरू करण्यात येत आहे. दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमातील पहिले सत्र हे पुणे विद्यापीठामध्ये तर बाकीची तीन सत्रे जर्मनीमध्ये एफएफएल इन्स्टिटय़ूटमध्ये होणार आहेत. या अभ्यासक्रमासाठी लेखी परीक्षा, मुलाखती या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी सुरुवातीला ३५० विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. मात्र, नंतर युरो आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमी झालेल्या किमतीमुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद थोडा कमी झाला. अभ्यासक्रमाचे शुल्क हे जवळपास ७५ हजार युरो आहे. या वर्षी १५० विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाची परीक्षा दिली आहे. या अभ्यासक्रमासाठी २४ प्रवेश क्षमता आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेमधून ३७ विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झाली असून या विद्यार्थ्यांची मुलाखत गुरुवारी होणार आहे. पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष शिकवण्याला सुरुवात होणार आहे.