पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोटातील ‘सीमी’ या संघटनेचे दोन संशयित दहशतवादी तेलंगणमधील नळगोंडा जिल्ह्य़ात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत. तेथे झालेल्या चकमकीत एक पोलीस शहीद झाला आहे. या दोघांची माहिती घेण्यासाठी पुणे दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पथक तेलंगणला रवाना झाला आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याच्या वाहने उभी करण्याच्या जागेत १० जुलै २०१४ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाचा तपास करीत असताना एटीएसला सीसीटीव्ही चित्रीकरणात तीन दहशतवाद्यांचे चित्रीकरण मिळाले होते. या स्फोटात वापरलेली सायकल सातारा येथील न्यायालयातून चोरली होती. पुढे सप्टेंबर २०१४ मध्ये उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे एक बॉम्बस्फोट झाला होता. तेथील सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसलेले संशयित हे खांडवा कारागृहातून पळून गेलेले ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’चे (सीमी) कार्यकर्ते असल्याचे आढळून आले. त्यात एजाजुद्दीन उर्फ ऐजाज महंमद अजीजउद्दीन (मुंबई), मेहबुब उर्फ गुड्डू इस्माईल खान, अजमद रेहमान खान, अस्लम आयुब खान, झाकीर हुसेन उर्फ सादीक बद्रुल हुसेन आणि अबू फैजल उर्फ डॉक्टर हे सहा जण होते. तसेच, यातील एकाचे पुणे स्फोटात आढळलेल्या व्यक्तीशी साधम्र्य आढळून आले होते. कारागृहातून पळालेल्या या सहा जणांनीच पुण्यात स्फोट केल्याचा संशय बळावला होता. त्यामुळे महाराष्ट्र एटीएस या सहा जणांच्या मागावर होते.
तेलंगणमधील नळगोंडा जिल्ह्य़ात सूर्यापेट भागात २ एप्रिल रोजी दोन पोलीस ठाण्यावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये दोन पोलीस शहीद तर इतर तीन जण जखमी झाले होते. दरम्यान, मोखतूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत जानकीपुरम येथे त्यांचा पोलिसांनी पाठलाग केला असता ते मोटारसाकलवरून पळून जाऊ लागले. त्यांनी पोलिसांवर गोळीबर केला, त्यात नागराजू या पोलिसाचा मृत्यू झाला. त्याच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोघेही ठार झाले. चकमकीत ठार झाल्यानंतर हे दोघे एजाजुद्दीन उर्फ ऐजाज महंमद अजीजउद्दीन व अस्लम रमजान खान असल्याचे समजले. हे दोघेही पुणे बॉम्बस्फोटातील संशयित होते. हे खांडवा कारागृहातून पळालेले सीमीचे दहशतवादी आहेत. हे दोघे मारले गेले असले तरी त्यांचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत, अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.
अस्लम व एजाजुद्दीन हे पुणे बॉम्बस्फोटाली मुख्य संशयित आहेत. हे दोघे पोलीस चकमकीत ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याची माहिती घेण्यासाठी पुणे एटीएसचे एक पथक रवाना झाले असून ते पुढीत तपास करणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.