लग्नघर असलेल्या भावकीच्या घरी हळद दळून परत येत असताना तीन महिलांना भरधाव जीपने उडवले. त्यात दोघींचा मृत्यू झाला असून तिसरी अत्यवस्थ आहे. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जीपचालकास नागरिकांनी पाठलाग करून पकडले व बेदम चोप दिला. ही घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रावेत येथे घडली.
सुरेखा शिवाजी भोंडवे (वय-५५), सरिता आबासाहेब गलांडे (वय-२७) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. तर, चंपाबाई चैतराम गलांडे (वय-६०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. रावेतच्या भोंडवे परिवारातील विवाह सोहळ्यानिमित्त हळद दळण्याचा कार्यक्रम होता. तो उरकून या तिघी नातेवाईक महिला आपल्या घरी निघाल्या होत्या. रावेत-किवळे मार्गावर निवृत्ती लॉन्स मंगल कार्यालयासमोरचा रस्ता ओलांडण्यासाठी त्या थांबल्या. समोरून मोठा कंटेनर गेला, तेव्हा त्या रस्ता ओलांडण्यासाठी पुढे आल्या. मात्र, कंटेनरच्या मागून एक बलेरो जीप भरधाव वेगाने येत होती. ते लक्षात येण्यापूर्वीच जीपने त्यांना उडवले. अपघातानंतर जीपचालक पळून जात होता. मात्र, नागरिकांनी अर्धा किलोमीटपर्यंत त्याचा पाठलाग केला. किवळ्याजवळ त्यास पकडून बेदम चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी महिलांना उपचारासाठी थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, दोघींचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने जाहीर केले. तिसरी महिला अत्यवस्थ आहे. या घटनेने रावेत परिसरात शोककळा पसरली होती.