घुमान येथे साहित्य संमेलन होत असताना विविध कारणांनी जे तेथे उपस्थित राहू शकत नाहीत अशा साहित्यप्रेमींना पुण्यात राहूनही अक्षरखरेदीचे संमेलन साजरे करता येणार आहे. ‘अक्षरधारा बुक गॅलरी’ने शुक्रवारपासून (३ एप्रिल) तीन दिवस पुस्तके खरेदी करणाऱ्या साहित्यप्रेमींना २० टक्के सवलत जाहीर केली आहे.
संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे शुक्रवारपासून तीन दिवस ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. एवढय़ा दूरवरच्या अंतराचा प्रवास करूनही तेथे मराठी माणसांचे वास्तव्य नसल्याने पुस्तकांची विक्री होण्याची साशंकता असल्याने प्रकाशक या संमेलनापासून दूर राहिले आहेत. मान्यवर प्रकाशन संस्थांच्या गैरहजेरीमध्ये घुमान येथील ग्रंथप्रदर्शनामध्ये आवडत्या पुस्तकांची खरेदी होणे अवघड आहे. एरवी राज्यामध्ये होत असलेल्या संमेलनामधील तीन दिवसांत मिळून सुमारे लाखभर लोक भेट देतात आणि ग्रंथखरेदीची उलाढाल किमान तीन कोटी रुपयांच्या घरामध्ये होते. पुस्तक खरेदीसाठी कित्येक वाचनप्रेमी मराठी रसिक साहित्य संमेलनामध्ये ग्रंथखरेदीसाठी काही रक्कम बाजूला ठेवतात. त्यातून खरेदी करीत वाचनाची भूक भागविणाऱ्या रसिकांसाठी अक्षरधाराने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मराठी वाचकांना साहित्य संमेलनाची आठवण म्हणून तीन दिवस अभिजात साहित्यकृतींसह सर्वच वाङ्मयीन पुस्तकांच्या खरेदीवर २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. बाजीराव रस्ता येथील अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या साहित्यिकांच्या पुस्तकांचे स्वतंत्र दालन करण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, आचार्य अत्रे, रणजित देसाई, शिवाजी सावंत अशा वाचकप्रिय लेखकांच्या पुस्तकांचेही वेगळे दालन असेल. याखेरीज वाचक कट्टय़ावर पुस्तके चाळण्याची, बसून वाचन करण्याची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. घुमानला जाऊ न शकलेल्या परंतु ग्रंथखरेदीसाठी आतुर असलेल्या साहित्यप्रेमींना पुण्यामध्येच खरेदीचे संमेलन साजरे करता यावे हाच यामागचा उद्देश असल्याचे रमेश राठिवडेकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2015 रोजी प्रकाशित
घुमानला टाळून अक्षरधाराचे अक्षरखरेदीचे ‘संमेलन’
‘अक्षरधारा बुक गॅलरी’ने शुक्रवारपासून (३ एप्रिल) तीन दिवस पुस्तके खरेदी करणाऱ्या साहित्यप्रेमींना २० टक्के सवलत जाहीर केली आहे.

First published on: 01-04-2015 at 03:14 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 discount on book purchase by akshardhara